बेकायदा कर्मचारी भरती प्रकरणी फौजदारीची तयारी
By admin | Published: May 31, 2014 12:52 AM2014-05-31T00:52:27+5:302014-05-31T00:52:27+5:30
मनपा आयुक्त: हद्दवाढीतील ३०० कर्मचार्यांचे भवितव्य टांगणीला
सोलापूर: हद्दवाढ भागातील ग्रामपंचायतीमधून महापालिकेत वर्ग झालेल्या त्या ३०० कर्मचार्यांच्या भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ या बेकायदा भरती प्रकरणी ज्यांनी ज्यांनी मनपाची फसवणूक केली त्या सरपंच, ग्रामसेवक, कर्मचारी, मनपाच्या सेवानिवृत्त अधिकार्यांवर फौजदारी करण्याची तयारी मनपाने सुरू केली आहे़ याबाबत कायदेशीर सल्ला घेतला असल्याची माहिती मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी दिली़ महापालिकेची ५ मे १९९२ साली हद्दवाढ झाली त्यावेळी ११ गावे शहरात समाविष्ट झाली़ त्या ११ ग्रामपंचायतींमधील तब्बल ३०० कर्मचारी देखील मनपाकडे वर्ग करून घेतले आहेत़ हद्दवाढ होण्यापूर्वी १९९१ साली त्या त्या ग्रामपंचायतींमध्ये कर्मचार्यांची संख्या बोटावर मोजण्याएवढी होती; मात्र मनपामध्ये समाविष्ट होणार हे जाहीर होताच रातोरात बोगस सेवापुस्तके तयार करणे, कर्मचार्यांचे वय बसत नसताना त्यांची भरती दाखविणे, ग्रामपंचायतीचे उत्पन्न कमी असताना कर्मचार्यांच्या वेतनावर जास्त खर्च दाखविणे आदी अनेक गैरप्रकार करून ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांनी मनपा अधिकार्यांना हताशी धरून संगनमताने महापालिकेला टोपी घातली आहे़ वास्तविक पाहता कोणत्याही कर्मचार्यांची भरती करताना किंवा त्या कर्मचार्यांना वर्ग करताना पद रिक्त आहे का, नसेल तर पदनिर्मिती करणे, त्याला शासनाची मंजुरी घेणे आदी बाबी पूर्ण कराव्या लागतात, याकडे दुर्लक्ष करून शासनाची देखील मनपातील अधिकार्यांनी फसवणूक केली़ त्यामुळे आता ३०० कर्मचारी भरतीचा वाद ऐरणीवरचा विषय बनला आहे़ ग्रामपंचायतीचे त्यावेळचे सर्व सदस्य, ३०० कर्मचारी, मनपाचे अधिकारी या सर्वांवर फौजदारी होणार का याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत़ मजरेवाडी ग्रामपंचायत या सर्व बाबीत आघाडीवर असून त्यांनी २१० कर्मचारी भरती केल्याचे कागदोपत्री दिसून येते़ बोगस सेवापुस्तक तयार करण्यात देखील या ग्रामपंचायतीने मागेपुढे पाहिले नाही़ काही ग्रामपंचायतींचे रेकॉर्ड, त्यावेळचे सरपंच आणि ग्रामसेवकांची माहिती मिळत नसून ती संकलित करण्याचे काम सुरू असल्याचे सहायक आयुक्त अमिता दगडे-पाटील यांनी सांगितले़
-------------------------
बेकायदा कर्मचारी भरती...
हद्दवाढीतील ग्रामपंचायती मनपामध्ये समाविष्ट होणार हे जाहीर झाल्यावर रातोरात केली शेकडो कर्मचार्यांची बेकायदेशीर भरती ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, मनपा अधिकारी व कर्मचार्यांनी संगनमताने केली महापालिकेची फसवणूक पदनिर्मिती नसताना आणि पदांना मान्यता नसताना ३०० कर्मचार्यांना महापालिकेकडे केले वर्ग महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे ग्रामपंचायतीने दिलेले रेकॉर्ड उपलब्ध नाही -
----------------- ...
यांना दिल्या नोटिसा
आप्पासाहेब हत्तुरे (तत्कालीन सरपंच, मजरेवाडी), एऩटी़ चव्हाण (तत्कालीन ग्रामविकास अधिकारी, मजरेवाडी), पांडुरंग पवार (तत्कालीन सरपंच, प्रतापनगर), एस़बी़ जाधव (सेवानिवृत्त मनपा सहायक आयुक्त ), अनिल विपत (तत्कालीन विशेष कार्यकारी अधिकारी हद्दवाढ), व्ही़ए़ओनामे (सेवानिवृत्त मनपा सहायक आयुक्त ) या सहा जणांना संगनमताने मनपाची फसवणूक व नुकसान केल्याबद्दल नोटिसा दिल्या असून १५ दिवसात खुलासा देण्याचा आदेश दिला आहे़