पुन्हा संकट; शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी अन् हातात विम्याचा कागद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 11:13 AM2021-07-24T11:13:51+5:302021-07-24T11:14:27+5:30
चपळगाव मंडल: खरीप पीक विमा मंजूर व्हावे- शेतकऱ्यांची मागणी
चपळगाव - शंभूलिंग अकतनाळ
कोरोनामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे.यातुन सावरण्यासाठी खरीप हंगामातील पिके साथ देतील असे वाटत असतानाच गेल्या पंधरा दिवसांपासून चपळगाव मंडलात पडणारा रिपरिप पाऊस मात्र खरीप हंगामातील पिकांना घातकीचा ठरत आहे. पिकांमधील वाढलेले तण, पिवळे पडणारे रोग, जमिनीतील दलदलीने कुजणारे पीक अशा अनेक संकटातुन वावरणाऱ्या शेतकऱ्यांच्या नशिबी यावर्षीचा पीक विमा मंजूर झाला तरच चांगले आहे.अन्यथा आर्थिक संकटातील शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी धोक्याची घंटा निर्माण झाली आहे.
चपळगाव मंडलातील विशेषतः चपळगाव, हन्नुर, डोंबरजवळगे, बोरेगाव, बऱ्हाणपूर, पितापूर, चुंगी, किणी, दर्शनाळ, कुरनूर, चुंगी, अरळी, बावकरवाडी, सिंदखेड, मोट्याळ, दहिटणे आदी गावातील शेतकरी प्रामुख्याने दरवर्षी खरीप हंगामातील तुर, मुग, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, भुईमूग, मका, बाजरी आदी पिकांचे उत्पादन घेतात. यावर्षीदेखील खरीप पिकांवर बहुतांश शेतकऱ्यांनी भर दिला आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पडणारा रिपरिप पाऊस शेतकऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण करत आहे. कोळपे मारण्यासाठी वापसाच नसल्याने यावर्षी खरीप पिकांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर तण वाढले आहे. परिणामी पिकांवर विविध रोगांचा प्रादृर्भाव झाला आहे.औषध मारण्यासाठी उपयुक्त परिस्थिती नाही. अनेक दिवसांपासून सुर्यदर्शन नाही.यामुळे पिकांचे भवितव्य अंधारात जाणार आहे.
शेतकऱ्यांच्या संपूर्ण वर्षाचे अर्थकारण खरीप हंगामातील पिकांवर अवलंबून असते. मात्र यावर्षी प्रमाणापेक्षा जास्त पडणारा पाऊस खरीप पिकांना घातक ठरत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शेतकऱ्यांनी खरीप पिक विम्याचा हप्ता भरला आहे. सद्यस्थितीत संबधित प्रशासनाकडून पिकांची पाहणी होणे गरजेचे आहे.तसेच शासनाकडून खरीप पिक विमा रक्कम मंजूर होण्यासाठी आवश्यक कार्यवाही व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
आता आधार फक्त पीक विम्याचाच!...
सद्यस्थितीत जास्तीच्या पावसाने मुग व उडीद पिकांना फटका बसला आहे.कित्येकांच्या शेतात पाणी असल्याने उभी खरीप पिके कुजत चालली आहेत.संपूर्ण वर्षाचे अर्थकारण खरीप पिकांवर अवलंबून असते. मात्र जास्तीच्या पावसाने खरीप पिके हातुन गेल्यात जमा आहेत.आता आधार आहे तो भविष्यात पिक विम्याची रक्कम मिळण्यावरच....!
चपळगाव मंडलात
सरासरीच्या २४० टक्के पाऊस..
कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जुलै महिन्यात चपळगाव मंडलात सरासरीच्या २४० टक्के पाऊस पडला आहे.तर पावसाळा सुरू झाल्यापासून सरासरीच्या १७२ टक्के इतका पाऊस पडल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत.।