आमच्यासाठी कोरोनाचे संकट महत्त्वाचे, त्यांच्यासाठी मंदिर असेल : शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 09:02 PM2020-07-19T21:02:22+5:302020-07-19T21:03:11+5:30
अयोध्येतील राम मंदिराच्या पायाभरणीबाबत व्यक्त केले
सोलापूर : आमच्यासाठी कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमधून बाहेर पडणे महत्त्वाचे आहे. त्यांच्यासाठी मंदिर महत्त्वाचे असेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केले.
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी पवारांनी रविवारी येथील नियोजन भवनमध्ये आढावा बैठक घेतली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवारांना राम मंदिर उभारणीबाबत प्रश्न विचारण्यात आला.
पवार म्हणाले, आपत्तीच्या काळात कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचे याचा निर्णय प्रत्येकाने घ्यायचा असतो. कोरोनाच्या संकटाला कसे बाहेर काढायचे याची चिंता आम्हाला वाटते. त्या कामाला आमचे प्राधान्य असेल. काही लोकांना असे वाटत असेल की मंदिर बांधून कदाचित कोरोना जाईल. या भावनेतून त्यांनी हा निर्णय घेतला असावा असे वाटते. मला याबद्दल फारशी माहिती नाही. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे संबंध अर्थव्यवस्थेवर परिणाम होतोय. राज्य आणि केंद्र सरकारने या गोष्टीत लक्ष घालावे, असे मला वाटते. महाविकास आघाडीचे खासदार लवकरच यासंदर्भात दिल्लीला जाऊन आपल्या मागण्या मांडतील, असेही त्यांनी सांगितले.