'कोरोना' चे संकट दूर व्हावे अन् जे आजारी आहेत ते लवकर बरे व्हावेत...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 11:34 AM2020-05-25T11:34:10+5:302020-05-25T11:44:03+5:30
मुस्लिम बांधवांकडून प्रार्थना; सोलापुरात रमजान ईदचा उत्साह, हस्तांदोलन अन् गळाभेट टाळून एकमेकांना शुभेच्छा...!
सोलापूर : देशासमोर कोरोना आजाराचे सर्वात मोठे संकट आहे. हे संकट दूर व्हावे, जे आजारी आहेत ते लवकर बरे व्हावेत. या आजाराच्या संकटामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. उद्योगधंदे बंद असल्याने सोलापुरातील श्रमिकांसमोर आपली उपजीविका चालविणे अवघड बनले आहे. या श्रमिकांना आर्थिक सुबत्ता लाभो. देश अधिकाधिक प्रगती करो. देशातील एकता अबाधित राहो, यासाठी अल्लाहकडे प्रार्थना करण्यात आल्याची माहिती शहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अली काझी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
दरवर्षी साजºया होणाºया रमजान ईदप्रमाणे यंदाची ईद वेगळ्या पद्धतीने साजरी होत आहे. ईदनिमित्त मुस्लिम बांधव एकमेकांना न भेटता व्हॉटसअप, एसएमएस, फोनव्दारे शुभेच्छा देत आहेत. सामुदायिक नमाज पठण न करता घरातच नमाज अदा करून देशाच्या एकतेसाठी व आरोग्य चांगले रहावे याशिवाय कोरोनापासून देशावरील संकट दूर व्हावे यासाठी प्रार्थना केली.
रमजान महिन्याचे ३० रोजे पूर्ण झाल्याने सोमवारी २५ मे रोजी रमजान ईद साजरी करण्यात आली. सध्या ३१ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे दरवर्षी ईदगाह मैदानावर होणारी सामूहिक नमाज यंदाच्या वर्षी झाली नाही़ रमजान ईदची नमाज ही ईदगाहमध्ये जाऊनच अदा करण्यात येते; मात्र लॉकडाऊनमधील नियमांचे पालन करत प्रत्येकाने आपल्या घरामध्ये ईदची ‘चार रकात चाशत’ची ‘नफिल नमाज’ किंवा ‘दोन रकात शुकराना नमाज’ अदा केली.
ईदच्या दिवशी मुस्लीम बांधव आपापल्या घरी गोड पदार्थ करतात. विशेष म्हणजे रमजान ईद दिनी क्षीरकुर्मा करून खाण्याची पद्धत आहे. रमजान ईद दिनी गळाभेटीला विशेष महत्त्व असते; मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर घरीच राहून ईद साजरी करण्यात आली.
ईदच्या एक दिवस आधी तसेच ईदची नमाज अदा करण्याच्या आधी गरजूंना मदत केली जाते. याला ‘सदके फित्र’ असे म्हणतात. यामागचा उद्देश हा प्रत्येकाच्या घरात ईद साजरी केली जावी असा आहे. यावर्षी लॉकडाऊन असल्याने अनेक लोकांसमोर आर्थिक अडचणी आहेत. त्यामुळे सदके फित्रच्या माध्यमातून अधिकाधिक गरजूंना मदत करण्यात येत आहे.
हस्तांदोलन व गळाभेट टाळून एकमेकांना शुभेच्छा
- सोलापुरात सकाळपासूनच रमजान ईदचा माहोल आहे. हस्तांदोलन व गळाभेट टाळून एकमेकांना शुभेच्छा देण्यात येत आहेत़. शक्य होईल तितके गर्दीपासून दूर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आपापल्या घरीच रमजान ईद साजरी करण्यात येत आहे़ रमजान ईदची खरेदी करताना काळजी घ्यावी. विविध वस्तू खरेदी न करता आपल्या व आपल्या कुटुंबीयांसाठी बचत करावी. तसेच बचतीतून गरजू लोकांना मदत करावी असे आवाहन शहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अली काझी यांनी केले आहे.