अजित पवारांच्या सभेला गर्दी; परवानगी मागणाऱ्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 02:26 PM2021-04-09T14:26:43+5:302021-04-09T14:26:58+5:30
कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध तिसरा गुन्हा दाखल
पंढरपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव असतानादेखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यामुळे या कार्यक्रमासाठी परवानगी घेणारे राष्ट्रवादीचे श्रीकांत नारायण शिंदे यांच्या विरुध्द तालुका पोलीस ठाण्यात भादवि कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत गर्दी केल्याने आठ दिवसात हा तिसरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भगीरथ भारत भालके यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुरुवारी सकाळी सभा झाली.
या प्रचार सभेस व स्पीकर लावणेसाठी श्रीकांत नारायण शिंदे यांनी पत्राद्वारे परवानगी मागणी केली होती. व्यवस्थापन यांनी नेमुन दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रचारसभेस परवानगी दिली होती.
मात्र सुरक्षित शारीरिक अंतर ठेवण्याबाबत निर्गमित केलेल्या आदेशाचे सभेचे आयोजकांनी उल्लघंन केले. यामुळे विस्तार अधिकारी बिभीषण अर्जुन रणदिवे यांनी श्रीकांत शिंदे यांच्याविरुध्द शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.