मोक्षदा एकादशीनिमित्त पंढरपुरात भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:18 AM2020-12-26T04:18:29+5:302020-12-26T04:18:29+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आदेशानुसार विठ्ठल मंदिर दीपावली पाडव्यापासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून ...

Crowd of devotees in Pandharpur on the occasion of Mokshada Ekadashi | मोक्षदा एकादशीनिमित्त पंढरपुरात भाविकांची गर्दी

मोक्षदा एकादशीनिमित्त पंढरपुरात भाविकांची गर्दी

Next

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आदेशानुसार विठ्ठल मंदिर दीपावली पाडव्यापासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना सध्या विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाऐवजी मुखदर्शन घडविले जात आहे. दीपावली पाडव्यापासून जरी भाविकांसाठी मंदिर खुले केले असले तरी त्यानंतरच्या कार्तिकी यात्रेच्या काळात पुन्हा शहरात संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे चैत्री आणि आषाढी यात्रेप्रमाणेच कार्तिकीदेखील संचारबंदीतच भाविकांविना पार पडली. त्यामुळे शहरात म्हणावी तशी भाविकांची वर्दळ जाणवत नव्हती.

सध्या मार्गशीर्ष महिना आणि त्याला लागूनच ख्रिसमस आणि शनिवारी, रविवारच्या सुट्यांमुळे गुरुवारपासून पंढरपुरात भाविकांची गर्दी दिसू लागली आहे. शहरातील मोकळ्या पडलेल्या पार्किंगच्या ठिकाणांवर भाविकांच्या गाड्यांची गर्दी दिसून आली. याबरोबर मंदिर परिसरदेखील भाविकांच्या गर्दीने गजबजलेला दिसून आला.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनेदेखील मार्गशीर्ष महिना, नाताळाच्या सुट्यांमुळे भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन जास्तीत जास्त भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घेता यावे, यासाठी दर्शनाचा कोटादेखील वाढविलेला आहे. २१ डिसेंबरपासून दिवसाला प्रत्येक स्लाँटमध्ये ४०० भाविक अशा रितीने दिवसभरात १२ स्लाँटमध्ये ४ हजार ८०० भाविकांना विठ्ठलाचे मुखदर्शन घडविले जात आहे. त्यासाठी ऑनलाइन पध्दतीने बुकिंग आवश्यक आहे.

खरेदीसाठी दिसली गर्दी

भाविकांच्या वर्दळीमुळे मंदिर परिसरातील कुंकू-बुक्का, तुळशीच्या माळा, फुलविक्रेते, वेगवेगळ्या धातूंच्या मूर्ती, फोटोफ्रेम आदी प्रासादिक वस्तूंबरोबरच सोलापुरी चादरी, घोंगडी, लहान मुलांच्या खेळण्यांच्या दुकानामधून भाविकांची खरेदीसाठी गर्दी दिसत होती.

मोक्षदा एकादशीचे माहात्म्य

पत्नी कामुक होऊन विलास भोगण्याकरिता पतीकडे गेली असता पतीने जर तिला विलास भोग दिला नाही तर पतीला त्याचा दोष लागतो. याप्रमाणे पूर्वी गोकुळात वैखानस नावाच्या राजाच्या पित्याला दोष लागून तो नरकात गेला होता. पित्याची नरकातून मुक्तता होण्यासाठी ऋषीमुनींनी सांगितल्याप्रमाणे वैखानस राजाने (सामान्य एकादशी व्रतात सांगितल्याप्रमाणे) मोक्षदा एकादशीचे व्रत केले. त्यामुळे त्याच्या वडिलाची नरकातून मुक्तता झाली.

फोटोओळी ::::::::::::::::::::::

विठ्ठल मंदिर परिसरात भाविकांची गर्दी झाली आहे.

Web Title: Crowd of devotees in Pandharpur on the occasion of Mokshada Ekadashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.