भर उन्हातही मीना बाजारात खरेदीसाठी लोकांची गर्दी!चप्पलपासून कपड्यांपर्यंत सर्व खरेदी एकाच छताखाली
By संताजी शिंदे | Published: April 8, 2024 06:34 PM2024-04-08T18:34:17+5:302024-04-08T18:34:38+5:30
चप्पलपासून कपड्यांपर्यंत सर्व खरेदी एकाच छताखाली असल्याने, भर उन्हातही महिला पुरुष ग्राहकांची गर्दी दिसून येत होती.
सोलापूर : गेल्या ६० वर्षांची परंपरा असलेल्या विजापूर वेस येथील मीना बाजारात यंदाच्या वर्षीही खरेदीसाठी हिंदू-मुस्लीम बांधवांची मोठी गर्दी झाली आहे. विविध ड्रायफ्रूट्स, अत्तरे, कपडे यासह अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाली आहे. चप्पलपासून कपड्यांपर्यंत सर्व खरेदी एकाच छताखाली असल्याने, भर उन्हातही महिला पुरुष ग्राहकांची गर्दी दिसून येत होती.
रमजानच्या पवित्र महिन्यात ईद साजरी करण्यासाठी सर्व वस्तू एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात, म्हणून दरवर्षी मीना बाजार भरविला जातो. बाराईमाम चौक, किडवाई चौक, बेगम पेठ या भागात हा बाजार भरतो. ईदच्या पार्श्वभूमीवर भरविण्यात आलेल्या बाजारात ४५० ते ५०० स्टॉलधारक आहेत़. यामध्ये पायांतील चपलांपासून डोक्याच्या तेलापर्यंत आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तूंचा समावेश आहे. संसारोपयोगी भांडी, खाद्यपदार्थ कमी किमतीत या ठिकाणी मिळतात. मीना बाजारात लातूर, उस्मानाबाद, विजापूर, पंढरपूर व स्थानिक व्यापाऱ्यांनी स्टॉल लावला आहे. योग्य किमतीत भरपूर खरेदी मीना बाजारात करता येते. खरेदीसाठी शहर व जिल्ह्यातून मोठी गर्दी केली होत आहे.
सुका मेव्याला मोठी मागणी
- शिरखुर्मा तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या ड्रायफ्रूट्सला मोठी मागणी दिसून येत आहे. बदाम, काजू, मावा, मनुके, पिस्ता, चारोळी, अक्रोड, मंगजबी, खारीक, अंजीर, खिसमिस, बडीसोप, इलायची, खसखस, शेवईला मागणी आहे. शेवईमध्ये अहमदाबादी, फेणी, मोगलाई आदींचा समावेश आहे. केशर, नमकीन पिस्ता, जरदाळू, काला मनुका, अफगाण मनुका यालाही ग्राहकांची पसंती आहे. बाजारात लक्ष्मी मार्केटच्या राेडवर सुक्या मेव्याची विक्री करणारे ५० ते ६० स्टॉल लावण्यात आले आहेत.
शंभर प्रकारचे अत्तर विक्रीला
- आत्म्याचं अन्न म्हणजे ‘रू की गीजा’ अशी ओळख असलेल्या अत्तराला दरवर्षी मोठी मागणी असते. ग्रीन मुश्क, चॅलेंज, ओन्ली वन, गुलनाज, गुलमोहर, डी लव्ह, फिरदोस, असिल, रॉयल प्रोफेसी, तुफान, हुदा आदी १०० प्रकारचे अत्तर सध्या मीना बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. आपल्या आवडीच्या अत्तराची खरेदी करताना दिसून येत आहेत.
ज्वेलरी खरेदीसाठी महिलांची झुंबड...
- ईदमध्ये महिलांना आवश्यक असलेल्या ज्वेलरीची विक्री करण्यासाठी अनेक स्टॉल लावण्यात आले आहेत. कानातील विविध फुले, गळ्यातील आकर्षक दागिने, हातातील बांगड्या, नेलपेंट आदी विविध वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
- सणातील आकर्षण असलेली मेहंदी विक्री करणारे स्टॉलही लावण्यात आले आहेत. नर्गिस, कॅटरिना, करिना, प्रेम दुल्हन, हिना आदी विविध प्रकारच्या मेहंदी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
- लहान मुलांपासून मोठ्या पुरुषांपर्यंत सर्वांसाठी बेल्ट, पाकीट, गॉगल्स, चप्पल, बूट, सँडल विक्रीचे स्टॉल लागले आहेत.