गणेशचतुर्थीनिमित्त नागरिकांची खरेदीसाठी गर्दी; मात्र पोलिसांनी केली नाकाबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:23 AM2021-09-11T04:23:46+5:302021-09-11T04:23:46+5:30
प्रत्येकवर्षी पंढरपूर शहरासह ग्रामीण भागात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. मात्र मागील वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रातिनिधिक व ...
प्रत्येकवर्षी पंढरपूर शहरासह ग्रामीण भागात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. मात्र मागील वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रातिनिधिक व साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून परंपरा जपली जात आहे. यावर्षीही मोठ्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना न करता ५ फुटापर्यंतच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. त्या नियमानुसारच मूर्तिकारांनी मूर्ती बनविल्या होत्या. ५ फुटापर्यंतच्या आकर्षक गणेशमूर्ती बाजारात विक्रीसाठी ठेवल्या होत्या. त्यामुळे नागरिकांकडून छोट्या मूर्ती खरेदीसाठी प्रतिसाद दिसत होता.
गणेशचतुर्थी दिवशी पंढरपूर नगरपरिषद रोड, भादुले चौक, अर्बन बँक चौक, चौफळा, श्रीनाथ चौक, गांधीरोड, स्टेशन रोड परिसरात गौरी-गणपती सजावटीसाठी आवश्यक साहित्य, प्रसाद, पूजेच्या साहित्याची दुकाने थाटली होती. या परिसरात हार, पूजेचे साहित्य, प्रसाद, खेळणी, गणपती टोपी, गणेश व गौरींच्या मूर्ती खरेदीसाठी नागरिकांची दिवसभर मोठी गर्दी होती.
गणपती बाप्पा मोरया.. कोरोनाला हरवा..
पंढरपूर शहर, व ग्रामीण भागातील सार्वजनिक मंडळे, सामाजिक संघटना, घरगुती मंडळांच्या आनंदावर कोरोनामुळे मर्यादा आल्या आहेत. तरीही अनेक मंडळे हा महोत्सव साध्या पद्धतीने साजरा करून परंपरा जोपासत आहेत. आजही अनेक मंडळे, गणेशमूर्ती खरेदीसाठी येत होते. मात्र मूर्ती घेऊन जात असताना प्रत्येकवर्षी जो उत्साह असतो तो दिसत नव्हता. घोषणा, वाद्यांचा खणखणाट दिसत नव्हता. काही कार्यकर्ते, नागरिक, प्रातिनिधिक स्वरुपात येऊन मूर्ती घेऊन जाताना दिसत होते. मूर्ती घेऊन जाताना नेहमीच्या घोषणा न देता ‘गणपती बाप्पा मोरया.. कोरोनाला हरवा..’ अशा नवीन घोषणा देऊन कोरोनामुक्तीसाठी गणपती बाप्पाला साकडे घालताना दिसत होते.