सलग सुट्यांमुळे अक्कलकोटमध्ये गर्दी, पण गैरसोयीमुळे भक्तांची नाराजी
By रूपेश हेळवे | Published: January 27, 2024 05:35 PM2024-01-27T17:35:13+5:302024-01-27T17:35:54+5:30
मागील चार दिवसांपासून शासकीय सुट्टी होती. यामुळे देश विदेशातून स्वामी भक्त दर्शनासाठी येताहेत.
सोलापूर : सलग चार दिवस शासकीय सुट्टी आल्याची संधी साधून स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी लोटली. शेजारच्या जिल्ह्यातून आणि देश-विदेशातून हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. यावेळी अनेक भक्तांनी पार्किंग ठिकाणी झोपून रात्र काढावी लागली. यावेळी त्यांना गैरसोयिंना तोंड द्यावे लागले, अशी तक्रार भक्तांकडून केली जात आहे.
मागील चार दिवसांपासून शासकीय सुट्टी होती. यामुळे देश विदेशातून स्वामी भक्त दर्शनासाठी येताहेत. वाढती गर्दी पाहता मंदिर समितीने दैनंदिन धार्मिक कार्यक्रम रद्द करून भक्तांना दर्शन सुलभ केले. भक्तांच्या गर्दीमुळे रात्री उशिरापर्यंत दर्शन रांग लागत आहे.
दरम्यान, दर्शन रांगेत काहीच सुविधा पुरवता आल्या नाहीत. यामुळे ज्येष्ठांना रांगेत उभे राहून दर्शन घ्यावे लागले. जागोजागी पिण्याचे पाणी, दर्शन मंडप, स्वच्छता, बाकडे अशा सुविधा नव्हत्या. मोटारसायकल, रिक्षांची दर्शन रांगेत घुसखोरी झाली. पार्किंग व्यवस्थेचा बोजवारा उडाला. अनेकांनी स्वत:ची वाहनं ही रस्त्या कडेला लावली. सतत वाहतूक कोंडी होत राहिली, असे नागरिकांचे मत होते.