दुकाने उघडल्याने नागरिकांची खरेदीसाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:27 AM2021-06-09T04:27:48+5:302021-06-09T04:27:48+5:30
तब्बल दोन महिने लॉकडाऊनमुळे शहरासह ग्रामीणमध्ये सकाळी ११ नंतर सामसूम असायची, ती सोमवारी गर्दीने फुलल्याचे पाहावयास मिळाले. या काळात ...
तब्बल दोन महिने लॉकडाऊनमुळे शहरासह ग्रामीणमध्ये सकाळी ११ नंतर सामसूम असायची, ती सोमवारी गर्दीने फुलल्याचे पाहावयास मिळाले. या काळात बऱ्याच छोट्या-मोठ्या अडीअडचणींना सामोरे जाण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली होती. कौटुंबिक खर्च, कामगारांचे पगार, बँकांचे हप्ते, दुकानाचे भाडे आदी खर्चिक गोष्टी चालूच होत्या. तर दोन महिने दुकाने बंद असल्यामुळे उत्पन्नाचे साधन बंद राहिल्याने व्यापाऱ्यांची आर्थिक घडी विस्कटल्याचे दिसून येत आहे. आता लॉकडाऊननंतर सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत सुरू करण्याची परवानगी मिळताच मोठ्या उत्साहाने व नव्या उमेदीने पुन्हा आपले व्यवसाय व्यापाऱ्यांनी सुरू केल्याचे दिसून आले.
लग्नसराईचा सिझन विनाउत्पन्न गेल्यामुळे कापड दुकानदार, संसारोपयोगी साहित्य विक्रेते, फर्निचर व्यावसायिक, सराफ दुकानदार, इलेक्ट्रॉनिक दुकानदार, चप्पल व्यावसायिक आदी उद्योगधंद्याचे आर्थिक बजेट लवकर सुधारेल, असे दिसत नाही.
सोमवारी बाजारपेठ उघडल्यानंतर नागरिकांनी कपडे, प्रापंचिक साहित्य, पावसाळ्यात छप्पर धाब्याच्या घरावर झाकण्यासाठी प्लास्टिक कागद, विविध प्रकारच्या वस्तू खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले. मात्र, कोरोनाचे संकट टळले नसल्याने नागरिक मास्कचा जबाबदारीने वापर करत असल्याचेही दिसून आले.
कोट :::::::::::::
कोरोनामुळे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत दुकाने बंद राहिली. त्यामुळे व्यापाऱ्यांना विस्कटलेली आर्थिक घडी सावरण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. नगरपालिकेने दोन महिन्यांच्या काळातील शहरातील छोटेमोठे व्यापारी, दुकानांची करआकारणी, गाळाभाडे, वीज वितरण कंपनीने वीजबिल माफ करावे. तर, बँकांनी दोन महिन्यांचे कर्जाचे व्याज माफ करावे.
- बाळासाहेब मस्के
उपाध्यक्ष, व्यापारी संघटना