दवाखान्यांत रुग्णांची गर्दी; खासगी तपासणीचे रिपोर्ट अप्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:27 AM2021-09-08T04:27:55+5:302021-09-08T04:27:55+5:30
मंगळवेढा : शहरासह तालुक्यात महिनाभरापासून डेंग्यूने तोंड वर काढले आहे. आतापर्यंत असंख्य डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आले असून खासगी रुग्णालयात ...
मंगळवेढा : शहरासह तालुक्यात महिनाभरापासून डेंग्यूने तोंड वर काढले आहे. आतापर्यंत असंख्य डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आले असून खासगी रुग्णालयात असंख्य रुग्ण उपचार घेत आहेत. याची माहिती हिवताप विभागाला मिळत नाही. त्यामुळे डेंग्यूचा आकडा मोठा राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दीड वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यातून सावरत नाही, तर संसर्गजन्य आजारामुळे अनेकांना लागण झाली आहे. भरीस भर आता डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गतवर्षी तालुक्यातील काही भागातच डेंग्यूचे रुग्ण आढळून येत होते. यंदा मात्र संपूर्ण तालुक्यातून डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण पुढे आले आहेत. शहरीसह ग्रामीण भागातील हजारो रुग्ण शासकीयशिवाय खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
सध्या शासकीय रुग्णालयात तपासणी केलेल्या बऱ्याचशा नागरिकांना डेंग्यूसदृश आजार असल्याचे समोर आले आहे. खासगी रुग्णालयात हा आकडा असंख्य आहे. शहर व तालुक्यातील प्रत्येक रुग्णालयात ताप, सर्दी, खोकला, प्लेट्सलेट कमी झालेले रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णालयात उपचारांकरिता आलेल्या रुग्णांना सर्वप्रथम डेंग्यूची तपासणी करण्याचे सुचवण्यात येत आहे.
----
नगरपालिका, ग्रामपंचायतीचा निरुत्साह
दरवर्षी पावसाळ्यात कीटकजन्य आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होते. यंदा डेंग्यू आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. परिणामी, सर्वसामान्यांना चांगलाच आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शहरातसुद्धा नगरपालिकेने प्रत्येक वाॅर्डात औषध फवारणी करणे गरजेचे आहे.