शिक्षकांची कोरोना चाचणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी; पाच शिक्षक आढळले कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 03:32 PM2020-11-21T15:32:30+5:302020-11-21T15:32:36+5:30
माढा तालुका; कोविड टेस्ट करून घेण्यासाठी शिक्षकांची आरोग्य केंद्रात गर्दी...!
लक्ष्मण कांबळे/ कुर्डूवाडी
माढा तालुक्यात माध्यमिक विभागातील इयत्ता नववी ते बारावी पर्यंत असणाऱ्या १४३ शाळेतून सुमारे १९ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोनामुळे गेल्या आठ महिन्यापासून सर्व शाळा बंद आहेत, परंतु शासनाच्या आदेशाने २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग चालू होणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळेंनी वर्ग भरविण्याची तयारी केली असून त्या वर्गांचे शिक्षक सध्या कोविड टेस्ट करून घेण्यात मग्न आहेत. त्यामुळे त्या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांची कुर्डूवाडी व माढा येथील ग्रामीण रुग्णालयाबरोबरच तालुक्यातील आठही प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी दिसून येत आहे. शनिवारपर्यंत एकूण तपासलेल्या शिक्षकांत पाच शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
माढा तालुक्यात इयत्ता नववी ते बारावी पर्यंत शिकविणारे एकूण एक हजार दोनशे शिक्षक आहेत. त्यापैकी जवळपास नव्वद टक्के शिक्षकांची तपासणी करून झाली आहे. पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून दिलेल्या सूचनेनुसार सर्व शाळेच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांनी आपापल्या शाळेत सोमवारी भरणाऱ्या वर्गाची तयारी करण्यासाठी पालकांची बैठक घेतली आहे. काहींनी ऑनलाईन मिटिंग घेतली आहे. याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीची बैठकही विविध ठिकाणी पार पडत आहेत. याबरोबरच शाळा व वर्ग खोल्यांचे स्वच्छता अभियान देखील सध्या प्रत्येक शाळेत राबविण्यात येत आहे. संपूर्ण शाळा सॅनिटायझर करण्यासाठी शिक्षक प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर शिक्षण अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील प्रत्येक शाळा ही निम्मे निम्मे विद्यार्थी एक दिवसाआड येतील व एका बाकावर एकच बसतील अशीही तयारी करीत आहेत.तालुक्यात माध्यमिक वर्गासाठी सुमारे एक हजार दोनशे शिक्षक कार्यरत आहेत.
सोमवारी सुरू होणारी शाळा ही चार तासांची असेल.व त्यात गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयावर जास्तीत जास्त शिक्षक फोकस करतील आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांची संमती गरजेची असणार आहे असे परिपत्रक माढा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून काढले आहे. शाळा भरणार असल्याने विद्यार्थी आनंदित आहेत परंतु त्यांचे पालक मात्र कोरोनाच्या धास्तीने अजूनही आपला निर्णय शाळेला देत नसल्याचे नगरपालिकेचे मुख्याध्यापक भोसले यांनी सांगितले.
------------------------
शासनाच्या आदेशानुसार सोमवारपासून नववी ते बारावी पर्यतचे सर्व वर्ग कोविड बाबत सुचनांची अंमलबजावणी करीत भरणार आहेत. त्यासाठी तालुक्यातील सर्व संबधीत शाळेंंना योग्य ते आदेश दिले आहेत. त्याची सर्वांनी कडक अंमलबजावणी करावी.व काळजी घ्यावी. यासाठी पालकांची संमती अनिवार्य आहे.
- बंडू शिंदे
विस्ताराधिकारी, शिक्षण विभाग, माढा