पोलिसाने केली क्रेन चालकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 01:35 PM2019-05-14T13:35:43+5:302019-05-14T13:36:52+5:30
सोलापूर शहर मुख्यालयातील पोलीस कर्मचाºयाविरूध्द गुन्हा दाखल
सोलापूर : न्यायालयासमोरील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील नो पार्किंग झोनसमोरील मोटरसायकल का उचलली असा जाब विचारत, वाहतूक शाखेच्या क्रेन चालकाला मारहाण केली. या प्रकरणी मुख्यालयातील पोलीस कर्मचाºयाविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी दुपारी १२.३0 वाजण्याच्या सुमारास घडला.
रविकिरण कोडपाक (नेमणूक पोलीस मुख्यालय) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाºयाचे नाव आहे. कोडपाक याने न्यायालयासमोरील नो पार्किंग झोनमध्ये स्वत:ची मोटरसायकल लावली होती. चालक सुरेश शिंदे (वय ५७, रा. हौसेवस्ती, आमराई) हा वाहतूक शाखेची क्रेन (क्र. एमएच-१३ आर-0७२२) घेऊन आला. क्रेनवरील कर्मचाºयांनी कोडपाक याची मोटरसायकल उचलून पाठीमागे ठेवली. हा प्रकार लक्षात येताच जवळच असलेला रविकिरण कोडपाक क्रेन जवळ आला, त्याने माझी गाडी का उचलली असा जाब विचारत सुरेश शिंदे यांच्या थोबाडीत मारली. हा प्रकार पाहून क्रेनमध्ये बसलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद लक्ष्मण लोखंडे (नेमणूक वाहतूक शाखा दक्षिण ) हे खाली उतरले.
कोडपाक याला बाजूला करण्याचा प्रयत्न करीत असताना तो मिलिंद लोखंडे यांच्यावर मारण्यासाठी धावून गेला. गणवेशासह गच्ची पकडून ढकलून दिले. रस्त्यावरील दगड क्रेनच्या दिशेने भिरकावला. क्रेनमधील कर्मचाºयांनी उडी मारून दगड चुकवण्याचा प्रयत्न केला. कोडपाक रस्त्याच्या कडेला पडलेली लाकडी पट्टी घेऊन सुरेश शिंदे यांना मारण्यासाठी धावला. हा प्रकार पाहून सर्वजण क्रेनमध्ये बसून रंगभवनच्या दिशेने जात होते. कोडपाक रिक्षातून क्रेनचा पाठलाग करू लागला. रिक्षातून उडी मारून कोडपाक याने पुन्हा सुरेश शिंदे याला मारण्याचा प्रयत्न करू लागला. चालकाने वेग वाढवून क्रेन वाहतूक शाखा कार्यालयाजवळ नेली. कोडपाक वाहतूक शाखेच्या डंपिंग ग्राऊड येथे येऊन पोलीस हेड कॉन्स्टेबल शिरसट व काळे यांच्याशी हुज्जत घालत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. स्वत:ची गाडी घेऊन निघून गेला. पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद लोखंडे यांनी फिर्याद दिली आहे.
वॉकीटॉकीवरून नियंत्रण कक्षाला दिली माहिती...
- शहर वाहतूक शाखेच्या वतीने दररोज नो पार्किंगच्या गाड्यांवर कारवाई केली जाते. सोमवारी साध्या वेशात असलेल्या पोलिसांकडून क्रेन चालकावर होत असलेली मारहाण व गोंधळ पाहून लोक आचंबित झाले. मारहाणीत मिलिंद लोखंडे यांच्या तळहाताला मार लागला. पोलीस कर्मचारी रविकिरण कोडपाक याचा आक्रमक पवित्रा पाहून पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद लोखंडे यांनी वॉकीटॉकीवरून नियंत्रण कक्षाला माहिती दिली.