अळूच्या पेंढीची क्रेझ न्यारी... ग्राहकांवर पडते भुरळ भारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 05:17 PM2020-02-24T17:17:24+5:302020-02-24T17:21:56+5:30
अळूच्या शेतीतून मुलांना घडविलं; १७ गुंठ्यात साडेसात लाखांचे पीक : लऊळमधील माणिक भोंग शेतकºयाचा प्रयोग
लक्ष्मण कांबळे
कुर्डूवाडी : ते शेतातही राबतात, त्यानंतर स्वत:च बाजारात येऊन पेंढी-पेंढीने अळू विकतात़ त्यांच्या अळूची क्रेझ न्यारीच ठरली... तिची बाजारात ग्राहकांना भुरळ पडते आहे. अगदी १७ गुंठ्यात साडे सात लाखांचे पीक घेतले आहे लऊळमधील एका तरुण शेतकºयाने़
माणिक भोंग अळूची शेती पिकविणाºया शेतकºयाचे नाव आहे. लऊळ (ता. माढा) येथील माणिक भोंग यांनी शेतात नवा प्रयोग करण्याचा मनोदय केला. ३० वर्षांपूर्वी अळूची शेती करण्याचा निर्णय घेतला़ त्यांना दोन बंधूंची साथ मिळाली. ते अवघ्या १७ गुंठ्यात वर्षाला साडेसात लाख रुपयांचा नफाही मिळवतात. एकदा अळूची लागवड केली की ते तीन वर्षांपर्यंत चालते.
यासाठी भोंग यांनी प्रथम शेतीची मशागत करून त्यात तीन ट्रॉली शेणखत टाकले़ त्यानंतर अळूची लागवड केली. त्यासाठी त्यांनी मध्यम स्वरूपाची जमीन निवडली़ लागवडीनंतर त्यांनी एक-दोन महिन्यात विविध खतांची मात्रा दिली़ रोग नियंत्रणासाठी औषधांची फवारणी केली़ स्वत:च शेतीत राबल्याने मजूर लावावे लागले नाहीत़ त्यानंतर स्वत:च मोडनिंब, कुर्डूवाडी, टेंभुर्णी, अकलूज, माढा, मोहोळ या बाजारपेठेत नेऊन अळूची विक्री केली़ रोज ५०० ताज्या पेंढ्या विक्रीतून अडीच हजार रुपये मिळतात़ प्रतिपेंढी सरासरी पाच ते सात रुपयाला विकली जाते़ यासाठी घरातील सदस्यांचीही मदत होते.
पारंपारिक पिकातून पूर्वी फार काही उत्पन्न मिळत नव्हते़ वेगळा प्रयोग करायचे आणि उत्पन्न वाढवायचा विचार आला़ त्याला कुटूंबाची साथ मिळाली आणि तज्ज्ञांच्या मदतीने अळू शेती चांगल्यारितीने फुलवता आहे़ फळपिकापेक्षाही हे पीक सर्वाधिक उत्पन्न देणारे ठरले आहे़ हाच प्रयोग आता आणखी काही शेतकरी करताहेत, असे अळू उत्पादक माणिक भोंग
यांनी सांगितले.
केवळ अळू शेतीवर मुलांना केले उच्चशिक्षित
शेती हाच प्रमुख व्यवसाय असून, त्यात अळूला प्राधान्य दिले़ त्यातून आलेल्या उत्पन्नातून तिन्ही मुलांना उच्चशिक्षित केले़ त्यातील दोन मुले ही संगणकातील तज्ज्ञ आहेत़ एक जण अद्याप शिक्षण घेत आहे़ सुनाबाईसुद्धा उच्चशिक्षित आहेत.