कर्फ्यूत विद्यार्थी उपाशी राहू नयेत म्हणून ‘मेस’वाल्या मावशीनं दिली धपाटी-चटणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 11:02 AM2020-03-22T11:02:48+5:302020-03-22T11:04:51+5:30
जनता कर्फ्यूला सोलापुरात चांगला प्रतिसाद; मंगल मावशीची कर्फ्यूकाळातही सेवा चालूच
विलास जळकोटकर
सोलापूर: घराघरामध्ये कोरोनाशी लढा सुरुय.. प्रत्येकजण भेदरलेला... काय होणार कसं होणार.. शाळा-कॉलेजलाही सुट्टी दिल्यानं मुलं गावाकडं पोहचलीत.. त्यामुळे खानावळींही थंडावल्या आहेत. ३१ मार्चपर्यंत जवळपास १५ लाखांची उलाढाल थंडावली आहे. मात्र अजुनही चाकरमाने.. हातावरचे पोट असणाºया मंडळीं, विद्यार्थ्यांसाठी , घरगुती खानावळी सुरु आहेत. उद्या स्वयंस्फूर्त कर्फ्यू पुकारलाय. यात आपल्या बंद खानावळीमुळे गिºहाईकाचं पोट उपासी राहू नये म्हणून मंगलमावशी शिंदे यांनी कर्फ्यूच्या पूर्वसंध्येला कडक भाकरी, दही चटणी, धपाटे देऊन देऊन त्यांच पोट भागवण्याचा प्रयत्न केला. कर्फ्यूकाळातही सेवा दिली जाणार आहे.
सबंध जगभर कोरोना व्हायरसचं संकट ओढवलंय.. बघता बघता त्याचं लोण आपल्याकडंही येऊन पोहोचलंय. सारेच हादरलेत. शाळा-कॉलेजला सुट्ट्या जाहीर झाल्या.. मुलांनीही शहर सोडून आपापलं गाव गाठलं तसं ज्या मुलं-चाकरमान्यांना पोटभर जेऊन घालून आपल्या रोजी-रोटीवर संसार चालविणाºया सोलापूर शहरातील २००० च्या आसपास खानावळी ओस पडल्या आहेत. यांची आर्थिक बाजू पाहता १५ ते ३१ मार्च या काळातील १५ लाखांची उलाढाल थंडावली आहे. विजापूर रोड सैफूल परिसरातल्या न्यू झकास खानावळीचे रवींद्र शिंदे त्यांच्या माऊली मंगलमावशी यांनी आपल्याकडे असलेल्या गिºहाईक कर्फ्यूमुळे उपासीपोटी राहू नये म्हूणून कर्फ्यूच्या पूर्वसंध्येलाच कडक रोटी अन् धपाटे देऊन ग्राहकाप्रती माणुसकी दाखवली.
सोलापूर जिल्ह्याचं कार्यक्षेत्र तसं मोठं आहे. दहावी-बारावीचं शिक्षण पार पडलं की, बहुतांश पालकांचा ओढा शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी राहिलेला आहे. आजही जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरून पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणारी मुलं सोलापुरात रूम करून अथवा वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहेत. गाव जवळ असणाºयांपैकी कोणाचे डबे एस.टी.मधून, दूध वाहतूक करणाºया वाहनांतून येतात. ज्यांना शक्य नाही अशी मुलं आपापल्या महाविद्यालयाच्या, रुमच्या आसपास असणाºया खानावळीद्वारे (मेस) जेवणाचा लाभ घेतात. काही महाविद्यालयांत होस्टेलवरच खानावळीची सोय आहे.
शहरातील दयानंद, संगमेश्वर, वालचंद या मोठ्या महाविद्यालयांशिवाय एलबीपी महिला महाविद्यालय, आयएमएस, वसुंधरा, शिवदारे, सोनी, ए. आर. अशा अनेक महाविद्यालयांमध्ये मुलं शिक्षण घेताहेत.
जवळपास दोन हजारांहून अधिक मुलं खानावळ (मेस)चा लाभ घेतात. अनेक खानावळींमध्ये महिन्याकाठी १२०० ते २५०० पर्यंत फी घेतली जाते. आता खानावळी बंद असल्यामुळे महिन्याचं गणित मांडलं तर जवळपास ३० लाखांची उलाढाल थंडावल्याचे सांगण्यात येत आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये, या अनुषंगाने महाराष्टÑ शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. शाळा-कॉलेजना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. यामुळे कॉलेजची होस्टेल्स रिकामी झाली आहेत. यामुळे आम्हाला खानावळींनाही सुट्ट्या द्याव्या लागल्याचे अशोक चौकातील जैन मेसचे इंद्रजित मेहता, सैफुल परिसरातील रवींद्र शिंदे यांनी सांगितलं.
मेसचा आम्हाला आधार
- परगावाहून शिक्षणासाठी शहरात येताना जेवणासाठी मेसचा आम्हाला आधार ठरतो. गाव दूर असल्याने दररोज तेथून डबा येणं अशक्य असतं. म्हणून आम्ही आमच्या सोयीनुसार जवळच्या ठिकाणी मेसचा आधार घेतो. सध्या शासनाच्या आदेशानुसार मेस बंद ठेवण्यात आल्याने आम्ही आपापल्या गावी परतलो आहोत, अशा प्रतिक्रिया सूरज पाटील, आदिनाथ शिंपले, संजय तोडकरी, संदीप गायकवाड, महेश कटगेरी, शैलेश कुंदूर, निखिल दुर्वे या वेगवेगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बोलताना सांगितलं.
कोरोना व्हायरसच्या साथीमुळे कॉलेजने आम्हाला मेस बंद ठेवण्याचे पत्र दिले, म्हणून १५ मार्चपासून मेस बंद ठेवली आहे. आमच्याकडील ४५ मुलं गावाकडं गेली आहेत. कॉलेजकडून जेव्हा आदेश मिळेल तेव्हाच मेस सुरू ठेवणार आहोत.
- सचिन कल्याणशेट्टी, आॅर्किड कॉलेज खानावळ, सोलापूर