माघवारीसाठी पंढरपुरात संचारबंदीचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:42 AM2021-02-21T04:42:21+5:302021-02-21T04:42:21+5:30
माघवारी निमित्त दरवर्षी ३ ते ४ लाख भाविक पंढरपूरमध्ये असतात. मात्र आटोक्यात येत असलेला कोरोना पुन्हा डोके वर काढू ...
माघवारी निमित्त दरवर्षी ३ ते ४ लाख भाविक पंढरपूरमध्ये असतात. मात्र आटोक्यात येत असलेला कोरोना पुन्हा डोके वर काढू लागल्याने प्रशासनाने पंढरपुरात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येऊन गर्दी करु नयेत. यासाठी संचारबंदीचा निर्णय घेतला आहे. ही संचारबंदी पंढरपूर शहर व भटूंबरे, चिंचोळी भोसे, शेगांव दु, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर, वाखरी, कोर्टी, गादेगाव-शिरढोण व कौठाळी आदी गावांमध्येही लागू करण्यात आली आहे.
----
वाहतूक सेवा नियंत्रित ठेवा
माघी वारीला बहुसंख्य वारकरी हे रेल्वे, एस. टी. महामंडळाची बस, खासगी वाहनांतून येतात. माघ शुद्ध दशमी व एकादशी या काळात ही वाहतूकसेवा पूर्णत: बंद न करता नियंत्रित ठेवावी. त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी, वैद्यकीय सेवा व इतर सेवा चालू राहतील. मंदिर परिसरापासून दूरवर अंतरावर सर्वसामान्य प्रवासी उतरेल. याबाबत आवश्यक ते नियोजन करण्यात येणार आहे.
--
साध्या पद्धतीनं चक्रीभजन
कोरोना विषाणूजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातून येणाऱ्या सर्व पायी दिंड्डयांना पंढरपुरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. २४ फेब्रुवारीला श्रीं ना नैवेद्य दाखविण्याची परंपरा आहे. त्या दिवशी दोन व्यक्तींना मंदिरात प्रवेश देण्यात यावा. २५ फेब्रुवारीला ह.भ.प. औसेकर महाराजांना ११ मानकऱ्यांच्या उपस्थितीत श्री विठ्ठल मंदिर सभा मंडपात योग्य ती खबरदारी घेवून साध्या पध्दतीने चक्रीभजन होईल.
पुंडलिकराया उत्सवाचा काला या कार्यक्रमात पुजाऱ्यासह २५ वारकऱ्यांना परवानगी देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढला आहे.