पंढरपुरात संचारबंदी; मोकाट फिरणाºयांवर पोलिसांनी ठेवली ड्रोनद्वारे नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 11:11 AM2020-08-10T11:11:48+5:302020-08-10T11:14:19+5:30
संचारबंदीचा तिसरा दिवस; पोलिसांची कडक नाकेबंदी, शहरात शुकशुकाट
पंढरपूर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून पंढरपूर शहरात सात दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. आज तिसºया दिवशी पोलिसांनी नाकेबंदी अधिक कडक केली आहे. त्यामुळे मंदिर परिसर, प्रमुख मार्ग, चौक व शहरातील नेहमी गजबजलेल्या भागात शुकशुकाट जाणवला. याकाळात काही निमित्ताने बाहेर पडणारे, गल्लीबोळात मोकाट फिरणाºयांवर पोलिसांनी ड्रोनद्वारे नजर ठेवली.
संचारबंदीच्या तिसºया दिवशी प्रशासनाने ‘चेस द व्हायरस’ या मोहिमेला गती देत रॅपिड अँटिजेन टेस्ट राबविली. त्याला नागरिकांनीही प्रतिसाद दिला. टाकळी परिसरातील नागरिकांनी ‘पूर्व कल्पना का दिली जात नाही ?’असा प्रश्न करीत आरोग्य यंत्रणेविरोधात नाराजी व्यक्त केली़ सोलापूर नंतर जिल्ह्यात पंढरपुरात कोरोनाचा विळखा सर्वाधिक घट्ट होत आहे. आत्तापर्यंत १ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद पंढरपूर शहर व तालुक्यात झाली आहे़ त्यापैकी २४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांबरोबर प्रशासनही सतर्क झाले आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पंढरपूरमध्ये सात दिवसांची संचारबंदी अवलंबली आहे.
विनाकारण फिरणाºयांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. काहीजण पोलिसांची नजर चुकवून शहरातील गल्लीबोळातून फिरताना दिसून आले़ अशा नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी आता ड्रोनचा वापर सुरू केला आहे़ पंढरपूर शहरात सध्या पोलीस, आरोग्य, सफाई, महसूल कर्मचारी, हॉस्पिटल व मेडिकल व्यतिरिक्त कोणीही दिसत नसल्याने शहरात शुकशुकाट आहे.
प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर व आजूबाजूच्या गावात रॅपिड अँटिजेन टेस्ट मोहीम जोरदारपणे राबविली गेली़ मागील दोन दिवसांमध्ये दोन हजारावर रॅपिड टेस्ट करून २०० पेक्षा जास्त रुग्ण शोधून काढण्यात आले.
लक्ष्मीटाकळी कोरोनाचा नवा हॉटस्पॉट...
पंढरपूर शहरालगत असणारा लक्ष्मी टाकळी परिसर हा सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. त्या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण सापडत आहेत. म्हणून त्या परिसरातही रॅपिड अँटिजेन टेस्ट मोहीम राबविली़ कोणी वंचित राहू नये म्हणून ही टेस्ट करायच्या आदल्या दिवशी कल्पना दिल्यास अधिकाधिक लोक चाचण्या करून घेतील असा सूर काही ज्येष्ठांमधून उमटला़
चौकाचौकात जाणवला शुकशुकाट
संचारबंदीचा शनिवारी तिसरा दिवस होता़ पहिल्या दोन दिवसांचा अनुभव पाहता शनिवारी पोलिसांनी नाकाबंदी आणखी कडक केली़ शहरात आंबेडकर चौक, शिवाजी चौक, सरगम चौक, कराड नाका, सांगोला नाका, नवीन सोलापूर रोड, जुना सोलापूर रोड परिसरात पोलिसांनी लोखंड बॅरिकेड्स लावून रस्ते सील केले. येणाºया जाणाºयांची चौकशी, लायसन्स, त्याचे कारण, आवश्यक कागदपत्रे याची तपासणी करून सोडले.