पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी संचारबंदी शिथिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:23 AM2021-04-09T04:23:54+5:302021-04-09T04:23:54+5:30
पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी १७ एप्रिलला मतदान आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी आदेश जारी केले आहेत. ...
पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी १७ एप्रिलला मतदान आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी आदेश जारी केले आहेत.
आदेशात नमूद केले आहे की, १० आणि ११ एप्रिलला कोणत्याही वैध कारणाशिवाय किंवा परवानगी शिवाय सार्वजनिक ठिकाणी संचार करण्यास बंदी आहे. तथापि या आदेशानुसार निवडणूक प्रचार आणि अनुषांगिक कामकाजास्तव १० एप्रिल रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ते ११ एप्रिलच्या रात्री ८ वाजेपर्यंत ही संचारबंदी पंढरपूर विधानसभा मतदार संघाच्या क्षेत्रासाठी शिथिल केली आहे. मात्र, जमावबंदीचे मनाई आदेश लागू राहतील.
पंढरपूर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सभा, रॅली यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी परवानगी द्यावी. मात्र, त्यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. कार्यक्रम बंदिस्त ठिकाणी असल्यास उपलब्ध जागेच्या ५० टक्के परंतु २०० पेक्षा जास्त व्यक्ती नसतील, या मर्यादेत परवानगी द्यावी. असे कार्यक्रम खुल्या जागेत असल्यास जागेच्या ५० टक्के क्षमतेपर्यंत परवानगी द्यावे, असे आदेशात नमूद केले आहे.
सभेच्या ठिकाणी कोविड विषयक नियमांचे पालन होते किंवा कसे याची खात्री करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी, कर्मचारी नियुक्ती करण्यात यावी, असे नमूद केले आहे. उमेदवारांकडून नियमांचा दोनपेक्षा जास्त वेळेस भंग केल्यास अशा उमेदवारांना पुढील राजकीय मेळाव्यासाठी परवानगी देता येणार नाही, असे आदेशात नमूद केले आहे. सर्व राजकीय कार्यक्रमात कोविड विषयक नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील, असेही नमूद केले आहे.