सोलापूर शहरात दहा दिवस संचारबंदी करा; मनपा आयुक्तांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 05:35 PM2020-07-10T17:35:17+5:302020-07-10T17:36:52+5:30
पालकमंत्र्याकडे केली शिफारस; संचारबंदी लागू केल्याने कोरोना संपणार नाही, लोकप्रतिनिधींची भूमिका
सोलापूर : संचारबंदी लागू केल्याने कोरोना संपणार नाही. लोकांनी मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्स, गर्दी न करणे अशी काळजी घेतल्याशिवाय संसर्ग कमी होणार नाही, लोकांची ही मानसिकता बदलण्याची आपली जबाबदारी आहे अशी भूमिका लोकप्रतिनिधींनी पालकमंत्र्यांसमोर शुक्रवारी दुपारी मांडली.
कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी सोलापुरात संचारबंदी लागू करावी का या विषयावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महापालिकेतील गटनेते आमदार व अधिकाºयांची जिल्हा नियोजन भवनात बैठक घेऊन मते जाणून घेतली. महापौर श्रीकांचना यन्नम यांनी आरोग्य विभागाने गांभीर्याने चाचण्या करणे गरजेचे असल्याचे सांगितले़ चाचणी घेतल्यानंतर लोकांना घरी सोडून दिले जाते. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तरी लोक फिरत असतात, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी कसा होणार. महसूल प्रशासनाने महापालिकेलासहकार्य करण्याची गरज आहे. गरिबांसाठी सुविधा देण्यात याव्यात अशी सूचना केली.
सभागृहनेते श्रीनिवास करली यांनी शुक्रवारी सकाळी सातरस्ता येथे शिवसेनेचे कामगार नेते विष्णू कारमपुरी यांना पोलिसांनी फरपटत नेल्याबद्दल पालकमंत्री भरणे यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली. आनंद चंदनशिवे यांनीही अधिकारी वरिष्ठांचे गैरसमजूत करून देतात अशी कैफियत मांडली. त्यावर पालकमंत्री भरणे यांनी असे प्रकार पुन्हा घडू नयेत याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. विरोधी पक्ष नेते महेश कोठे यांनी कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी आरोग्य विभागाने कठोरपणे उपाययोजना केल्या पाहिजेत.
चाचण्या व्यवस्थित करून संबंधित लोकांना वेळेत क्वारंनटाईन करणे गरजेचे असल्याचे मत मांडले. आमदार प्रणिती शिंदे यांनी कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी लोकांनीही जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. संचारबंदी लागू केली म्हणून लगेच कोरोना संपणार नाही. संचारबंदी काळात गरीब लोकांना धान्य मिळावे अशी प्रशासनाने व्यवस्था करावी अशी सूचना केली. महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी रॅपिड टेस्ट करण्यासाठी व संसर्ग कमी करण्यासाठी शहरात दहा दिवस संचारबंदी लागू करावी अशी मागणी केली. पोलीस आयुक्त शिंदे यांनी संचारबंदी लागू झाल्यावर लोकांनी पोलीस प्रशासनाने सहकार्य करण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त केली.