सध्याची राष्ट्रवादी शरद पवारांच्या विचाराची राहिली नाही : चित्रा वाघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:16 AM2021-06-28T04:16:41+5:302021-06-28T04:16:41+5:30
अकलूज नगर परिषद व नातेपुते नगरपंचायत व्हावी यासाठी गत सहा दिवसांपासून प्रांत कार्यालयाबाहेर तीन गावच्या नागरिकांचे साखळी उपोषण सुरू ...
अकलूज नगर परिषद व नातेपुते नगरपंचायत व्हावी यासाठी गत सहा दिवसांपासून प्रांत कार्यालयाबाहेर तीन गावच्या नागरिकांचे साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाला भेट देण्यासाठी चित्रा वाघ अकलूज येथे आल्या होत्या. यावेळी त्या बोलत होत्या. प्रशासकीय मंजुरीत प्राथमिक टप्प्यात असणाऱ्या गावांना नगर परिषदेची मंजुरी दिली जाते. बारामती तालुक्यातील गावाला नगर परिषदेची मंजुरी मिळते; पण माळशिरस तालुका मोहिते पाटलांचा, भाजपचा म्हणून इथल्या गावांची मंजुरी अडवली जातेय. राष्ट्रवादीचे हे राजकारण नागरिकांच्या विकासाला मारक आहे. तुम्ही कितीही राजकीय खेळ खेळा; पण सोलापूर जिल्ह्यात तुमची डाळ शिजणार नाही, असेही चित्रा वाघ म्हणाल्या.
राजकारणाच्या खेळात जनतेला भरडू नका, असे आवाहन करत झेडपी सदस्या शीतलदेवी मोहिते-पाटील यांनी शासनावर कडाडून टीका केली, तर विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव होईल म्हणून राष्ट्रवादीने अकलूज व नातेपुतेची मंजुरी अडवून ठेवल्याची टीका आमदार राम सातपुते यांनी केली.
यावेळी आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, भाजपाचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील, वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, फातिमा पाटावाला, सुनंदा फुले, पायल मोरे, भाजप तालुकाध्यक्ष बाजीराव काटकर, संदीप घाडगे, हमिद मुलाणी, मुक्तार कोरबू, महादेव कावळे आदी उपस्थित होते.
आंदोलनाच्या मार्गाने तुमच्या दारापर्यंत येऊ
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अद्याप उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांची अडचण विचारली नाही. स्वतःला मामा म्हणवून घेणाऱ्या दत्ता मामांना अकलूज व नातेपुतेच्या बहिणींची जराही काळजी वाटत नाही. तुम्हाला आमच्या घरापर्यंत यायला जमत नसेल तर आम्ही आंदोलनाच्या मार्गाने तुमच्या दारापर्यंत येऊ, असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला.