संचारबंदीमुळे बंद दुकानाबाहेर थांबून करावी लागतेय ग्राहकांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:24 AM2021-08-15T04:24:38+5:302021-08-15T04:24:38+5:30
मागील वर्षापासून असलेली कोरोना महामारी, वाढत चाललेले कर्जाचे व्याज, थकलेले हप्ते, भाडे, आणलेल्या मालाच्या वाढत्या रकमा दुकानदार व लघु ...
मागील वर्षापासून असलेली कोरोना महामारी, वाढत चाललेले कर्जाचे व्याज, थकलेले हप्ते, भाडे, आणलेल्या मालाच्या वाढत्या रकमा दुकानदार व लघु व्यावसायिकांना चिंतेचा विषय ठरत आहे. यातच रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी प्रशासनाने संचारबंदीची घोषणा केली. यामुळे व्यावसायिकांचे कंबरडे पुरते मोडून गेले. सध्या सुरू असलेल्या संचारबंदीत रोजीरोटीसाठी केविलवाणा प्रयत्न करीत दुकानदार धडपडताना दिसत होते. महासंघाच्या मागणीला प्रशासनाने केराची टोपली दाखविली. यामुळे दुकानदार निराशाजनक वातावरणात बंदमध्ये सहभागी होताना दिसत होते.
संचारबंदीमध्ये गनिमी कावा
मोटार मेकॅनिकल, कार्पेंटर दुकानाच्या आजूबाजूला काम करताना दिसत होते. इतर काहीजण शटर बंद करून बाहेर काम करीत होते. किराणा व मेडिसीन, कृषी दुकानदारांच्या लगतची दुकाने बंद दाराआडून चालू होती. कापड दुकानदार पाठीमागच्या दारातून मोजक्या ग्राहकांना दुकानात सोडत होते. एकंदरीत प्रशासनाच्या बंद विरोधात रोजीरोटीसाठी लहान-मोठे व्यावसायिक गनिमी कावा वापरताना दिसत होते.