अकरावी प्रवेशाची ‘कट ऑफ’ घसरली; प्रवेश अर्ज संख्या निम्म्याने घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2021 12:38 PM2021-08-30T12:38:33+5:302021-08-30T12:39:17+5:30
ग्रामीण मुलांची शहराकडे पाठ; जाणकारांचाही अंदाज चुकला
सोलापूर : कोरोनामुळे मागील वर्षभरापासून पहिली ते पदवीचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे तसेच कोरोनाचा प्रभाव अजूनही झालेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी शहराकडे न येता ग्रामीण भागातच प्रवेश घेत आहेत. त्यामुळे शहरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी खूप कमी अर्ज केले आहेत. परिणामी यंदाची अकरावीची गुणवत्ता यादी म्हणजेच ‘कट ऑफ’ घसरली आहे.
यंदा दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना नववीच्या गुणांच्या आधारवर दहावीचे गुण देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढल्याचे अनेक जाणकरांचे मत होते. त्यामुळे यंदा शहरातील प्रमुख महाविद्यालयांचे ‘कट ऑफ’ तीन ते चार टक्क्यांनी वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. हा अंदाज यंदा प्रथमदर्शनी चुकल्याचे दिसत आहे. जाणकारांच्या मते यंदा टक्केवारी ९३ ते ९५ टक्के दरम्यान लागण्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता. शहरातील काही प्रमुख कॉलेजचा ‘कट ऑफ’ हा फक्त ९१ टक्के ते ८५ टक्केदरम्यान लागला आहे.
सोमवारी दुपारी तीन वाजता अकरावीची ‘कट ऑफ लिस्ट’ प्रत्येक शाळेत महाविद्यालयात लावली जाणार आहे. त्यानंतर अकरावीच्या प्रवेशाला सुरुवात होणार आहे. पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांना दोन तारखेपर्यंत महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे. तीन तारखेला दुसरी ‘कट ऑफ लिस्ट’ लागेल. यामुळे यंदा तिसरी ‘कट ऑफ लिस्ट’ अगोदरच सर्वच त्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ऑनलाईन, ऑफलाईन होणार गुणवत्ता यादी जाहीर
जे महाविद्यालय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवत आहे. त्या महाविद्यालयांचे ‘कट ऑफ लिस्ट’ ही सोमवारी सकाळी आपल्या संकेतस्थळावर दिली जाणार आहे. व ज्या महाविद्यालयांनी ऑफलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवत आहेत त्यांची यादी महाविद्यालयात प्रसिद्ध केली जाणार आहे.
अनेक विद्यार्थी हे दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला जास्त तयारी करून जास्त गुण घेत असतात. यंदा बोर्डाच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे त्या विद्यार्थ्यांची संधी हुकली. परिणामी त्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले. विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाल्याने ‘कट ऑफ लिस्ट’वर झाला. त्यामुळेच यंदा ‘कट ऑफ लिस्ट’ थोडी कमी लागेल.
हनुमंत जामदार, शिक्षणतज्ज्ञ