सोलापुरातील अकरावी प्रवेशाचे ‘कट ऑफ’ घसरले; दुसऱ्या यादीसाठी केली जुळवाजुळव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 01:13 PM2021-09-04T13:13:20+5:302021-09-04T13:13:32+5:30
महाविद्यालयांची कसरत : शहरातील प्रमुख कॉलेज ७१ टक्क्यांपर्यंत क्लोज
सोलापूर : अकरावी प्रवेशासाठी यंदा नामांकित महाविद्यालयांनाही कमी अर्ज आल्याने महाविद्यालयांचे ‘कट ऑफ’ अपेक्षेपेक्षा घसरत कमी टक्क्यांवर क्लोज झाली. यामुळे दुसरी यादी प्रसिद्ध करताना काही महाविद्यालयांना पहिल्या यादीतील प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा दुसऱ्या यादीत नाव टाकत जुळवाजुळव करावी लागली. सोबतच गुरुवारी प्रसिद्ध झालेली दुसरी यादी ८७ टक्के ते ७१ टक्क्यांपर्यंत क्लोज झाली.
चंडक ज्युनिअर कॉलेज ८७.४० टक्के, भारती विद्यापीठ ज्युनिअर कॉलेज ८६ टक्के, दयानंद ८५ टक्के, ए.डी. जोशी ८४.४० टक्क्यांवर क्लोज झाले. यंदा सोलापूर जिल्ह्याचा विक्रमी निकाल लागला. पण प्रवेशासाठी मात्र विद्यार्थ्यांनी कमी संख्येने अर्ज केले. यंदा कोरोनामुळे शिक्षण हे ऑनलाइन सुरू असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी नामांकित महाविद्यालयांचा अट्टाहास सोडून घराजवळील आणि गावाजवळील महाविद्यालयात प्रवेश घेण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे शहरातील अनेक महाविद्यालयांमध्ये अर्ज संख्या कमी आल्याची माहिती जाणकारांनी दिली.
दरम्यान, कागदपत्रांच्या अडचणीमुळे प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवारपर्यंत प्रवेश देण्यात येत होते. यामुळे अनेक महाविद्यालयांमध्ये एकाच ठिकाणी गर्दी झाल्याचे चित्रही दिसत होते तर दुसरीकडे अनेक महाविद्यालयात शिक्षक हे विद्यार्थ्यांची प्रतीक्षा करत असतानाही दिसत होते.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य
सध्या अकरावीची प्रवेशप्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांची आणि पालकांची ओढाताण होत असली तरी अनेक महाविद्यालयांमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश दिला जात आहे. तसेच अकरावी प्रवेशासाठी अर्ज ही कमी आल्याने अनेक महाविद्यालयांना दुसरी यादी प्रसिद्ध करताना विद्यार्थ्यांची जुळवाजुळव करत पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांचे नाव पुन्हा एकदा दुसऱ्या यादीत टाकावे लागले. यामुळे या महाविद्यालयांची तिसरी यादी प्रसिद्ध होईल का नाही हे सांगता येणार नाही, असे काही शिक्षकांचे मत आहे.