चौपदरीकरणासाठी वृक्षांची कत्तल पण पुनर्रोपनाचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:24 AM2021-04-23T04:24:12+5:302021-04-23T04:24:12+5:30
सांगोला : तालुक्यातून जाणाऱ्या सोलापूर - सांगली, सांगोला - पंढरपूर आणि जत - सांगोला या महामार्गाचे रुंदीकरण, काॅंक्रिटीकरणाचे ...
सांगोला : तालुक्यातून जाणाऱ्या सोलापूर - सांगली, सांगोला - पंढरपूर आणि जत - सांगोला या महामार्गाचे रुंदीकरण, काॅंक्रिटीकरणाचे कामासाठी अनेक पिढ्यांना ऑक्सिजन आणि सावली देणाऱ्या वृक्षांची कत्तल करण्यात आली पण प्रशासनाला पुनर्रोपनाचा विसर पडला आहे. प्रवाशांची आधार ठरणारी सावली यामुळे हरवली आहे.
तहानलेल्याला घोटभर पाणी पाजणे, ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सामाजिक संस्था, संघटना उन्हाळ्यात पाणपोईचा शुभारंभ करतात. यावर्षी कोरोनाच्या उद्रेकामुळे कोठेही पाणपोई दिसलेली नाही. तापमान ४२ अंश सेल्सिअसच्याही पुढे जात आहे. अशातच राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीसाठी ठेकेदारांनी सोलापूर-सांगली, सांगोला-पंढरपूर, इंदापूर-जत या महामार्गांवरील चिंच, लिंब, वड, बाभळ, पिंपळ, गुलमोहर या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली आहे. त्यामुळे हरवलेली सावली व सावलीतील थंड पाण्याचे माठ, रांजण गायब झाले आहेत. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
सांगोला बसस्थानकासह ग्रामीण भागात अनेक बसस्थानकांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. या रस्त्यावरुन जाणारे प्रवासी उन्हाळ्यात पाणपोईचा आधार घ्यायचे. मात्र, गतवर्षीपासून कोरोनामुळे कोणीही पाणीपोई सुरू केलेली नाही.
---
वृक्षांचे पुनर्रोपणाची होती आवश्यकता
या महामार्गावर अनेक मोठी जुनी झाडे तोडली गेली. ही झाडे ऑक्सिजनबरोबर सावलीही देत होती. ही झाडे तोडताना त्यांच्या पुनर्रोपणाचा निर्णय घेतला गेला नाही. सोलापूर-पुणे महामार्गाचे काम करताना अशा वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे. मात्र या महामार्गांवर तसे झालेले नाही.याची अंमबजावणी करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
------