देवीच्या नावाची जटा कापून, महिलेने गाडून टाकली अंधश्रद्धा; अंनिसच्या प्रयत्नाला यश
By संताजी शिंदे | Published: July 1, 2023 05:28 PM2023-07-01T17:28:45+5:302023-07-01T17:29:04+5:30
जटा कापून महिलेने अंधश्रद्धेला गाडून टाकले, यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रयत्न केले.
सोलापूर : आषाढ महिन्यात देव देवतांचा कोप होतो म्हणून डोक्यावरील जट काढू नकोस असा सल्ला दिल्याने, गेल्या सात वर्षापासून अंधश्रद्धेत असलेल्या मजूर महिलेने आखेर धाडस दाखवले. जटा कापून महिलेने अंधश्रद्धेला गाडून टाकले, यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रयत्न केले.
मम्मादेवी गोणे या गरीब कष्टकरी कुटुंबातील महिला आहेत, त्या मिळेल ती मजूरी करून स्वत:चे कुटुंब चालवतात. सात वर्षापूर्वी त्यांच्या केसात जट निर्माण झाली होती. त्यांनी याबाबत मैत्रिणीला माहिती दिली असता तिने ही देवाची जटा आहे. सध्या आषाढ महिना आहे, तु ही जटा कापू नको नाहीतर कोप होईल अशी भिती घातली होती. भितीपोटी व आंधळ्या श्रद्धेपोटी त्यांनी जटा वाढवली, देवीची देण असल्याचा समज करून ती तशीच ठेवली. मम्मादेवी यांना काहीजण काढ म्हणत होते, तर काही लोक राहू दे आता ही जटा तुला शेवटपर्यंत ठेवावी लागणार आहे असे सांगितले.
मम्मादेवी यांचीही मानसिकता निर्माण झाली होती, की ही देवाची जटा आता आपल्याला कधीच काढता येणार नाही. मात्र त्यांची बहिण सारिका बावडेकर यांनी जटानिर्मूलन करण्यासाठी त्यांना वारंवार प्रबोधन केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी त्यांची भेट घेतली देवाच्या नावाखाली कशी अंधश्रद्धा चालते हे पटवून दिले, शेवटी मम्मादेवी जटा काढण्यासाठी तयार झाल्या. जटा काढण्यासाठी अनिसच्या महिला सदस्यांना परवानगी दिली. अनिस शहर शाखेच्या महिला विभाग प्रमुख डॉ अस्मिता बालगावकर व जेष्ठ मार्गदर्शक उषा शहा यांनी मम्मादेवीची जट काढली व त्यांना जटमुक्त केले. या वेळी कार्याध्यक्ष व्ही.डी गायकवाड, आर.डी गायकवाड, मकरंद माने,सुनिल भालेराव उपस्थित होते.
वृत्त पत्रातील बातम्यांमुळे जटनिर्मुलनासाठी बळ मिळाले
निवृत्त बँक अधिकारी सुनील भालेराव यांनी मम्मादेवी यांना देगाव येथील राधाबाई राजगुरू यांच्या जटनिर्मुलनाची वृत्तपत्रातील बातमी वाचून दाखविली. त्या बातमीमुळे जटनिर्मुलन करण्यास अधिक बळ मिळाले असे मम्मादेवी गोणे यांनी सांगितले.