शिलाई मशीन चोरीस गेल्यावर रोजचा व्यवसाय बंद पडला; संभाजी ब्रिगेडनं नवं मशीन देताच कारागीर आनंदाने रडला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 02:43 PM2019-02-15T14:43:59+5:302019-02-15T14:58:16+5:30
सोलापूर : ज्या व्यवसायावर आपलं पोट त्या व्यवसायातील शिलाई मशीन पळवून चोरट्यानं जणू पोटावरच लाथ मारली... कुशन मेकरच्या डोळ्यांसमोर ...
सोलापूर : ज्या व्यवसायावर आपलं पोट त्या व्यवसायातील शिलाई मशीन पळवून चोरट्यानं जणू पोटावरच लाथ मारली... कुशन मेकरच्या डोळ्यांसमोर आलेला अंधार... संभाजी ब्रिगेडने नव्याने शिलाई मशीन देऊन हा अंधार दूर करीत शिवविचारांची शिवजयंती साजरी करीत बदलतं शहर-बदलत्या उत्सवाची प्रचिती दिली.
आसरा ब्रिजलगत असलेल्या कल्याण नगरात बलभीम शिंदे यांचा कुशन मेकरचा व्यवसाय आहे. रिक्षांचे टप बसवणे, दुचाकीचे सीट कव्हर तयार करणे, बॅगा शिवणे, रफू करणे आदी काम करताना शिंदे हे आपल्या संसाराचा गाडा हाकत असत. पाच-सहा दिवसांपूर्वी चोरट्याने त्यांचे कुशन मेकरचे दुकान फोडून शिलाई मशीन पळवली. ज्याच्यावर आपली उपजीविका चालायची, त्या उपजीविकेचे साधनच चोरट्याने पळविल्यामुळे त्यांचा चालता-बोलता व्यवसाय थांबला. काय करावं, हे शिंदे यांना सुचेना. चोरीस गेलेली मशीन तर हाती लागणार नाही अन् पैसे नसल्यामुळे नव्याने कशी आणायची? हीच चिंता त्यांना भेडसावू लागली.
संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम यांना शिंदे यांची करुण कहाणी समजली. ते आपल्या कार्यकर्त्यांसह त्यांचे कल्याण नगरातील दुकान गाठले. त्यांची मूळ व्यथा ऐकून काही तासांमध्येच श्याम कदम यांनी नवीन शिलाई मशीन त्यांच्यासमोर आणून ठेवली. नव्याने मशीन दुकानात आल्याचे समजताच बलभीम शिंदे यांना रडूच कोसळले. संभाजी ब्रिगेडचे आभार कसे मानावेत, हेही त्यांना सुचेना. बंद पडलेला व्यवसाय पुन्हा सुरू झाल्याने त्यांच्यासह कुटुंबातील सदस्यांचे पडलेले चेहरेही हसरे झाले.
यावेळी अरविंद शेळके, सीताराम बाबर, शिवशक्ती तरुण मंडळाचे अध्यक्ष गोविंद चव्हाण, कृष्णा झिपरे, सचिन होनमाने, श्रीशैल आवटे, गौरीशंकर वर्पे, संजय भोसले, सुखदेव जाधव, नितीन पवार, मल्लिकार्जुन शेगाव, महादेव पंगुडवाले, सागर सलगर, राम चव्हाण, नितीन देवकते, शिवराज वाले, रफिक शेख, सद्दाम शेख, आनंद गवसणी, सचिन क्षीरसागर, किरण बनसोडे, गणेश गवळी, शकील मणियार आदी उपस्थित होते.
मशीन नव्हे तर रोजची भाकरीच मिळाली-शिंदे
- ज्याच्यामुळे घरची चूल पेटत होती ती चूलच बंद पडली. कुशन मेकर अन् शिलाई मशीन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मशीनच चोरट्याने पळवली अन् बलभीम शिंदे हताश झाले. संभाजी ब्रिगेडचे श्याम कदम यांच्या रूपाने देवमाणूसच भेटला अन् नवीन मशीन आली. ही मशीन नव्हे तर मला, माझ्या कुटुंबाची भाकरीच मिळाली, अशी प्रतिक्रिया बलभीम शिंदे यांनी व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारातून संभाजी ब्रिगेडचे कार्य आहे. शिवविचारांमधून बलभीम शिंदे यांना मशीन देऊन त्यांचा थांबलेला व्यवसाय पुन्हा सुरू झाला, याचा विशेष आनंद आहे.
-श्याम कदम,
शहराध्यक्ष- संभाजी ब्रिगेड.