सॅम, डॉली अन् जॉकीला रोजच व्यायाम; गुन्हा घडो ना घडो वास घेण्याचं काम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2021 03:33 PM2021-10-03T15:33:47+5:302021-10-03T15:33:53+5:30
श्वानपथक : आरोपी कोणत्या दिशेने गेला याचा अचूक मार्ग दाखवितात
सोलापूर : जिल्ह्यामध्ये घडलेल्या खून, घरफोडी, स्फोटके व अंमली पदार्थाच्या शोधांसाठी ग्रामीण पोलीस दलातील श्वानपथकाची मदत घेतली जाते. जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत ९७ घटनांमध्ये श्वानांना नेण्यात आले. त्यात श्वानांनी काढलेल्या मागावरून पोलिसांना गुन्ह्याच्या तपासाची दिशा ठरवता आली. या श्वानांमुळे अनेक गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी पोलिसांना मोठी मदत होत असते.
सोलापूर ग्रामीण पोलीस दलामध्ये सध्या लेब्राडॉग, जर्मन शेफर्ड, डॉबरमॅन असे तीन जातीचे श्वान आहेत. लॅब्रॉडॉग जातीचे तीन, जर्मन शेफर्ड एक, दोन डॉबरमॅन असे एकूण सहा श्वान कार्यरत आहेत. ग्रामीण पोलीस दलामध्ये गुन्हे शाखेचे दोन, बॉम्बशोधक पथकाची दोन तर घातपात कारवाईविरोधी पथकातील दोन श्वान सध्या कार्यरत आहेत. बॉम्बशोधक पथकातील सर्वांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण तर गुन्हे शाखेच्या श्वानांना नऊ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण पुणे येथील सीआयडी ऑफिसमध्ये दिले जाते. प्रशिक्षण झाल्यानंतर श्वान प्रत्यक्षात पोलीस खात्यामध्ये काम करतात. सकाळी नैसर्गिक विधी झाल्यानंतर त्यांना मैदानावर नेले जाते त्या ठिकाणी सराव घेतला जातो. दहा वाजता जेवण दिले जाते. दुपारी ३ वाजता पुन्हा ग्राउंडवर नेले जाते त्यानंतर ६ सहा वाजता जेवण दिले जाते. रोजच्या रोज त्यांना ट्रेनिंगमध्ये झालेल्या गोष्टी शिकविल्या जातात.
श्वानाने दिला तपासाला दिशा
- गेल्या वर्षी उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा येथे एका हॉटेलमधील मॅनेजरचा खून करण्यात आला होता. त्यानंतर मॅनेजरचा मृतदेह हॉटेलच्या पाठीमागे रानामध्ये पुरण्यात आला होता. हा खून हॉटेलमधल्या वेटरने केला होता. तो कोणत्या दिशेने पळून गेला याचा मार्ग सॅम आणि डॉलीने दाखवून दिला होता.
- दि.७ जून २०२१ रोजी माळशिरस येथे खुनाची घटना घडली होती. घटनास्थळावरून नाल्यापर्यंत सॅम व डॉलीने आरोपीचा मार्ग दाखविला होता.