पावडर निर्मितीसाठी ८० लाख लिटर दुधाचा दररोज होतोय वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 12:37 PM2020-04-02T12:37:21+5:302020-04-02T12:39:53+5:30
दुग्ध व्यवसाय कार्यालयाची माहिती; खुली विक्री बंद होत असल्याचा परिणाम
सोलापूर: पॅकिंग व खुल्या पद्धतीने होणारी दूध विक्री जवळपास बंद झाल्यामुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. दूध विक्री होत नसल्याने एकट्या पश्चिम महाराष्ट्रातूनच दूध पावडर निर्मितीसाठी सुमारे ८० लाख लिटर दूध दररोज पाठवावे लागत असल्याचे पुणे प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास कार्यालयाकडून सांगण्यात आले.
राज्यात पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक दूध संकलन होते. १५ मार्चपर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात दररोज एक कोटी १० लाख लिटर दूध संकलन होत होते. हे दूध मुंबई, पुणे व अन्य शहरांत घरगुती वापरासाठी, हॉटेल व उपपदार्थ बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जात होते.
मात्र कोरोनाच्या निमित्ताने दक्षता घेण्यासाठी संचारबंदी लागू केल्यानंतर हळूहळू संकलन कमी केले जात आहे. सध्या दररोज ९० ते ९२ लाख लिटर इतकेच दूध संकलन होत असल्याचे सांगण्यात आले. अनेक लहान- मोठ्या संस्थांनी व व्यक्तींनी संकलन कमी किंवा बंद केल्याने सध्या १५ ते २० लाख लिटर दूध घरीच वापरावे लागते.हा फटका थेट शेतकºयांना बसत आहे.
पॅकिंग व लुज दुधाच्या विक्रीवर मोठा परिणाम झाल्यामुळे संकलन होणाºया दुधापैकी ७० ते ८० लाख लिटर दूध पावडरीसाठी वापरावे लागत असल्याचे सांगण्यात आले. वरचेवर दूध वितरणाच्या अडचणीत वाढ होत असल्याने संकलनातही कपात करावी लागत असल्याचे सोनाई दूध संस्थेचे दशरथ माने यांनी सांगितले.
दुधाची व्यवस्था करण्यासाठी दिले पत्र
- सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संकलन ४० हजार लिटरपेक्षा कमी झाले होते. आता खासगी संघाने दूध खरेदी बंद केल्याने जिल्हा संघाचे संकलन ५० हजार लिटरवर गेले आहे. शिवाय वरचेवर वाढच होत आहे. यापैकी २० हजार लिटर दूध पॅकिंग करुन विक्री होते. उर्वरित दुधाचे काय करायचे?, विक्रीची व्यवस्था करा, असे पत्र जिल्हा सहकारी दूध संघाने पुणे प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकाºयांना दिले आहे.
या दुधाचे करायचे काय?: माने
- खरेदी केलेल्या दुधाची विक्री करता येत नाही, पावडर तर किती बनविणार व पावडरीची विक्री झाली नाही तर दुधाचे पैसे शेतकºयांना कोठून द्यायचे?, असा प्रश्न सोनाई दूध संस्थेचे दशरथ माने उपस्थित केला आहे. खरेदी दुधाला किती दर द्यायचा हा तर प्रश्न वेगळाच असल्याचे माने यांनी सांगितले.