चाळीस लाखांसाठी जप्ती आणली म्हणून बँकेवरच डल्ला; शिपायाच्या हाती चाव्या अन् कर्जदाराच्या बॅगेत नोटा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 04:31 PM2019-12-18T16:31:55+5:302019-12-18T16:34:53+5:30

बार्शीतील चोरीचा दहा तासांत तपास; ६८ लाखांची रक्कम मंदिराच्या खोलीतून जप्त; पोलिसांनी केली दोघांना अटक

Dalla rests on bank for forfeiture of Rs 4 lakh; Bite into the soldier's note and note in the debtor's bag! | चाळीस लाखांसाठी जप्ती आणली म्हणून बँकेवरच डल्ला; शिपायाच्या हाती चाव्या अन् कर्जदाराच्या बॅगेत नोटा !

चाळीस लाखांसाठी जप्ती आणली म्हणून बँकेवरच डल्ला; शिपायाच्या हाती चाव्या अन् कर्जदाराच्या बॅगेत नोटा !

googlenewsNext
ठळक मुद्देचाळीस लाखांसाठी जप्ती आणली म्हणून बँकेवरच डल्ला मारलाशिपायाच्या हाती असलेल्या चाव्यामुळेच ही चोरी करण्यात आल्याचे समोर आलेजप्त केलेली रक्कम मंदिराच्या खोलीत आढळल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले

सोलापूर/बार्शी : बार्शी येथील उस्मानाबाद जनता सहकारी बँकेतील तिजोरी सुट्टीच्या दिवशी डुप्लिकेट चावीच्या साह्यााने उघडून ६८ लाख ४३ हजार ८०० रुपये चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच अवघ्या १० तासांतच पोलिसांनी तपास करून शोध लावला. त्यात बँकेचा कर्मचारी विजय विश्वंभर परीट व खातेदार महावीर चांदमल कुंकूलोळ (वय ४७, रा. बालाजीनगर, बार्शी) या दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयात उभे करताच न्यायाधीश आर. एस. धडके यांनी २३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. चाळीस लाखांसाठी जप्ती आणली म्हणून बँकेवरच डल्ला मारला. शिपायाच्या हाती असलेल्या चाव्यामुळेच ही चोरी करण्यात आल्याचे समोर आले. जप्त केलेली रक्कम मंदिराच्या खोलीत आढळल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले. 

 शहरातील घोडे गल्लीत ही बँक असून, सुट्टीच्या दिवशी म्हणजे १४ ते १६ डिसेंबरदरम्यान घडली होती. याबाबत बँकेचे व्यवस्थापक शशिकांत शहाजी देशमुख (रा. उस्मानाबाद) यांनी शहर पोलिसांत तक्रार देताच पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि़ ३८०, ४५४ व ४५७ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

 या धाडसी चोरीचा तपास तातडीने करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी आदेश दिले. तपास करताना पोलिसांना यातील आरोपी कुंकूलोळ याचे सीसीटीव्हीमधील अस्तित्व, आरोपीचे सीडीआर व त्याने दिलेली उत्तरे पडताळून पाहता विसंगती आढळली. तसेच गुन्हा घडलेल्या काळातील कॉलमुळे आरोपीचा संशय आल्याने त्यास अटक करण्यात आली. तिजोरी बंदोबस्तासाठी असलेला बँकेचा कर्मचारी परीट यास अटक करून पोलिसी खाक्या दाखवला. त्याने सर्व माहिती देताना त्यात महावीर कुंकूलोळ याचेही नाव पुढे आले. या दोघांना १० तासांतच अटक करून यात चोरलेल्या रकमेतील ६७ लाख रुपयांची रक्कमही जप्त करण्यात आली. 
अटक केलेल्या दोघांना न्यायालयासमोर उभे करताच सरकारच्या वतीने अ‍ॅड. प्रसाद कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला. उर्वरित रक्कम जप्त करण्यासाठी व डुप्लिकेट चावी कोणाकडून तयार केली, इतर कर्मचाºयांचा सहभाग आहे का, हे पाहण्यासाठी पोलीस कोठडीची गरज असल्याचे न्यायालयासमोर मांडले. यावरुन न्यायालयाने आरोपींना २३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार बार्शी विभागीय पोलीस उपअधीक्षक सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, सहा. फौजदार अजिनाथ वरपे, पोलीस उपनिरीक्षक पे्रमकुमार केदार, पोलीस इसाक सय्यद, सहदेव देवकर, चंद्रकांत आदलिंगे, घोंगडे, सचिन आटपाडकर, संताजी अलाट, चंद्रकांत घंटे, अमोल माने यांनी या चोरीचा पर्दाफाश केला.

सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले अन् पोलिसांना आला संशय
- शिपाई विजय विश्वंभर परीट हा बँकेत रात्रपाळीला होता. चोरी करण्यापूर्वी त्याने १५ डिसेंबर रोजी रात्री ८ ते ९.३० दरम्यान बँकेतील सीसीटीव्ही कॅमेºयांचे बटन बंद केले होते. त्यामुळे दीड तासाचे रेकॉर्डिंग झाले नव्हते. पोलिसांना याच प्रकाराचा संशय आला. त्यांनी रात्रपाळीचा शिपाई विजय परीट याला विश्वासात घेऊन चौकशी केली. तेव्हा महावीर चँदमल कुंकूलोळ हा भेटण्यासाठी आला होता, त्याने मला भेळ खाण्यासाठी नेले होते, असे सांगितले. महावीर कुंकूलोळ याची चौकशी केली असता त्याने मी बँकेत आलोच नव्हतो, असे सांगितले. पोलिसांनी दोघांना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. 

चावी ठेवण्यात गल्लत झाली अन् चोरी सापडली
- बँकेची तिजोरी उघडण्यासाठी तीन चाव्या आवश्यक असतात. त्यापैकी दोन चाव्या या बँक कॅशियर अर्जुन देवकर यांच्या कपाटामध्ये असतात, तर मास्टर चावी ही बँकेचे पासिंग अधिकारी बाबासाहेब कांबळे यांच्या कपाटात ठेवलेली असते. याची माहिती विजय परीट याला होती. दिवसपाळीत विजय परीट याने दोन्ही कपाटाच्या चाव्या खिशात घालून बाहेर गेला होता. बनावट चाव्या तयार करून त्याने पुन्हा आणून ठेवल्या. घटनेच्या दिवशी रात्रपाळीला असताना विजय परीट याने महावीर कुंकूलोळ याच्यासमवेत आत गेला. चोरी केल्यानंतर तिजोरी पुन्हा आहे तशी बंद केली. चाव्या दोन वेगवेगळ्या कपाटात ठेवण्याऐवजी ती एकाच कपाटात ठेवली. १६ डिसेंबर रोजी बाबासाहेब कांबळे हे बँकेत आले. त्यांना त्यांच्या कपाटाला लॉक नसल्याचे लक्षात आले. कपाट उघडून पाहिल्यानंतर त्यांच्या कपाटातील तिजोरीची चावी नसल्याचे आढळून आले. अर्जुन देवकर यांनी त्यांचे कपाट उघडले तेव्हा तिजोरीच्या सर्व चाव्या त्यांच्या कपाटात आढळून आल्या. या प्रकाराचा दोघांनाही संशय आला. त्यांनी तिजोरीकडे धाव घेतली. आत जाऊन पाहिले असता तिथे चोरी झाल्याचे लक्षात आले. 

पैसे लपवण्यासाठी मंदिरातील रुमचा आसरा
- महावीर कुुंकूलोळ याने काही दिवसांपूर्वी एका मंदिरातील खोली बुक करून ठेवली होती. चोरी केल्यानंतर त्याने सर्व पैसे मंदिरात राहण्यासाठी असलेल्या रूममध्ये ठेवले होते. पोलिसांनी जेव्हा त्याच्या घराची व दुकानाची झडती घेतली तेव्हा कोठेच पैसे मिळून आले नाहीत. अधिक चौकशी केली असता त्याने ते पैसे मंदिरात बुक केलेल्या रूममध्ये ठेवल्याची कबुली दिली.

दोघांवर यापूर्वी  कोणताही गुन्हा नाही
- बँकेतील शिपाई विजय परीट व महावीर कुंकूलोळ या दोघांवर यापूर्वी कोणताही गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल नाही. बँकेत सततच्या येण्या-जाण्याने   महावीर कुंकूलोळ याची विजय परीट याच्यासोबत मैत्री झाली होती. बँकेतील तिजोरी     लुटण्याचे नियोजन गेल्या            १५ दिवसांपासून सुरू होते.       सुट्टीचा दिवस गाठून दोघांनी    बँक लुटली. 

महावीर कुंकूलोळ हा दोन कोटींचा कर्जदार 

  • -  महावीर कुंकूलोळ हा बार्शी येथील अडत व्यापारी असून, त्याने ४ वर्षांपूर्वी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेतून व्यवसायासाठी २ कोटींचे कर्ज घेतले होते. आजतागायत त्याने १ कोटी ६0 लाखांचे कर्ज फेडले आहे. बँकेला तो - 0 लाखांचे देणे होता. हप्ते तटवल्याने बँकेने त्याच्या घरावर जप्तीची कारवाई करण्याचा इशारा दिला होता. बँक आपल्या घरावर जप्ती आणण्यापूर्वीच त्याने शिपायाला हाताशी धरून चोरीचा प्लॅन केला. चोरी केल्यानंतर त्याने ही रक्कम समसमान वाटून घेण्याचे ठरवले होते. 
  • चिल्लर नोटा नेता आल्या नसल्याने १० लाख वाचले
  • - विजय परीट व महावीर कुंकूलोळ यांनी तिजोरी उघडून आत प्रवेश केला, तेव्हा त्यांनी आतील ५०० व दोन हजाराच्या ६८ लाख ४३ हजार ८०० रुपयांच्या नोटा बॅगेत भरल्या. बाकी १0, २0 अन् १00 रुपयांच्या चिल्लर नोटा घेऊन जाण्यास अडचण असल्याने ते तेथेच सोडून दिल्या. 

Web Title: Dalla rests on bank for forfeiture of Rs 4 lakh; Bite into the soldier's note and note in the debtor's bag!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.