बंधारे दुरुस्ती मंजुरीची फाइल प्रशासकीय यंत्रणेत अडकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:21 AM2021-04-18T04:21:25+5:302021-04-18T04:21:25+5:30
१५ व १६ ऑक्टोबर रोजी सांगोला तालुक्यासह माण खोऱ्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे माण नदीला पूर आला होता. पुराच्या प्रवाहामुळे ...
१५ व १६ ऑक्टोबर रोजी सांगोला तालुक्यासह माण खोऱ्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे माण नदीला पूर आला होता. पुराच्या प्रवाहामुळे नदीवरील बलवडी, चिणके, वाटंबरे येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचा गुंतावा (भिंत) पडून शेजारच्या शेतातील भरावा, तसेच याच नदीवरील सांगोला व सावे येथील कोल्हापूर पद्धतीच्या दोन बंधाऱ्यांचे भराव वाहून गेले. दरम्यान, माण नदीवरील पुराच्या पाण्यामुळे एकाच वेळी ५ बंधाऱ्यांना भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाऊ लागल्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी संबंधित बंधाऱ्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी केली होती.
त्यानुसार, पाटबंधारे शाखा सांगोला यांच्यामार्फत बलवडी, चिणके, वाटंबरे, सांगोला, सावे या बंधाऱ्यांचे सर्वेक्षण करून बलवडी, चिणके व वाटंबरे बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी ९२ लाख याप्रमाणे २ कोटी ७६ लाख रुपये, तर सांगोला व सावे बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी ६५ लाख, याप्रमाणे १ कोटी ३० लाख असे ३ कोटी ४६ लाख रुपये अंदाजे दुरुस्तीचा प्रस्ताव मुख्य अभियंता विशेष प्रकल्प पुणे विभाग यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवून दिला होता.
पावसाळ्यापूर्वी बंधारे दुरुस्ती गरजेची
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्र्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजासाठी मंत्रालयात येण्यावर कडक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधीची फाइल मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रशासकीय मंजुरीच्या बासनात अडकली आहे. वास्तविक, आगामी पावसाळ्यापूर्वी बंधारे दुरुस्त होणे गरजेचे आहे. मात्र, दुरुस्तीच्या कामासाठी निधीची घोषणा होऊनही मंजुरी न मिळाल्याने, आणखी किती दिवस शेतकऱ्यांना बंधारे दुरुस्तीची वाट पाहावी लागणार, हे सध्या तरी सांगणे कठीण आहे.
कोट :::::::::::::::::
अतिवृष्टीच्या पावसात माण नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात ५ बंधाऱ्यांचे भराव वाहून भगदाड पडले होते. त्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव अंदाजपत्रक तयार करून पाठवून दिला होता. मात्र, प्रस्तावाला प्रशासकीय पातळीवर अद्याप मंजुरी न मिळाल्यामुळे बंधारे दुरुस्तीचे काम रखडले आहे.
- धनंजय कोंडेकर
कार्यकारी अभियंता, भीमा पाटबंधारे विभाग
फोटो ओळ :::::::::::::::::::::
ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीच्या पावसात माण नदीला आलेल्या पुरात बलवडी बंधाऱ्याचा भरावा वाहून गेल्याचे छायाचित्र.