बंधारे दुरुस्ती मंजुरीची फाइल प्रशासकीय यंत्रणेत अडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:20 AM2021-04-19T04:20:04+5:302021-04-19T04:20:04+5:30

१५ व १६ ऑक्टोंबर रोजी सांगोला तालुक्यासह माण खोऱ्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे माण नदीला पूर आला होता. पुराच्या प्रवाहामुळे ...

The dam repair approval file got stuck in the administrative system | बंधारे दुरुस्ती मंजुरीची फाइल प्रशासकीय यंत्रणेत अडकली

बंधारे दुरुस्ती मंजुरीची फाइल प्रशासकीय यंत्रणेत अडकली

Next

१५ व १६ ऑक्टोंबर रोजी सांगोला तालुक्यासह माण खोऱ्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे माण नदीला पूर आला होता. पुराच्या प्रवाहामुळे नदीवरील बलवडी, चिणके, वाटंबरे येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा गुंतावा (भिंत) पडून शेजारच्या शेतातील भरावा, सांगोला व सावे येथील कोल्हापूर पद्धतीच्या दोन बंधाऱ्यांचा भरावा वाहून गेल्यामुळे आ. शहाजीबापू पाटील यांच्याकडून बंधारे दुरूस्तीची कामे त्वरित करण्यासाठी पाटबंधारे अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू होता.

बंधारे दुरुस्तीसाठी जास्त कालावधी लागणार असल्याने दुरुस्तीचे काम निविदा काढून तातडीने करावीत, अशीही मागणी आ. शहाजीबापू पाटील यांनी पुणे येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. यानंतर पालकमंत्र्यांनी निधीची घोषणा करून तीन महिने उलटून गेले तरी मदत व पुनर्वसन खात्याकडून निधीस प्रशासकीय मान्यता न मिळाल्यामुळे माण नदीवरील बंधारे दुरुस्तीची फाईल शासनाच्या बासनात अडकली आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी बंधारे दुरुस्त होतील की नाही हे सांगणे कठीण आहे.

१४ कोटींच्या निधीची घोषणा

२३ जानेवारी रोजी सोलापूर येथे झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत आ. शहाजीबापू पाटील यांनी पुन्हा हाच मुद्दा उपस्थित केल्याने त्यांच्या मागणीची दखल घेऊन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व कृष्णा खोऱ्याचे कार्यकारी संचालक मुंडे यांच्याशी चर्चा करून सांगोला व पंढरपूर तालुक्यातील बंधारे दुरुस्तीसाठी सुमारे १४ कोटींच्या निधीची घोषणा केली होती.

कोट ::::::::::::::::::

अतिवृष्टीच्या पावसात माण नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात ५ बंधाऱ्याचे भराव वाहून भगदाड पडले होते. सांगोला पाटबंधारे विभागाकडून सुमारे ३ कोटी ४६ लाख रुपये दुरुस्तीचा प्रस्ताव अंदाज पत्रक तयार करून पाठविला. मात्र प्रस्तावाला प्रशासकीय पातळीवर अद्याप मंजुरी न मिळाल्यामुळे बंधारे दुरुस्तीचे काम रखडले आहे.

- धनंजय कोंडेकर

कार्यकारी अभियंता, भीमा पाटबंधारे विभाग

फोटो ओळ :::::::::::::::::::

ऑक्टोंबर महिन्यात अतिवृष्टीच्या पावसात माण नदीला आलेल्या पुरात बलवडी बंधाऱ्याचा भरावा वाहून गेल्याचे छायाचित्र.

Web Title: The dam repair approval file got stuck in the administrative system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.