बैल गेला अन् झोपा केला; नुकसानीची दोन महिन्यांनी पाहणी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 03:18 AM2020-12-18T03:18:24+5:302020-12-18T06:45:27+5:30
केंद्रीय पथक सोलापूर दौऱ्यावर येत असल्याने बाधित शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे.
सोलापूर : ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी होऊन राज्यात अनेक गावांना पुराचा फटका बसला. लाखो हेक्टर क्षेत्र बाधित झाले. मात्र आता २ महिन्यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक २० डिसेंबरला महाराष्ट्रात येणार आहे.
बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. सोलापूरला २२ डिसेंबरला सर्वाधिक नुकसान झालेल्या तालुक्यांची आधी पाहणी करणार आहे. बाधित क्षेत्राची पाहणी केल्यानंतर केंद्र सरकारला पथकाकडून अहवाल सादर होईल. केंद्रीय पथक सोलापूर दौऱ्यावर येत असल्याने बाधित शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी भागाची पाहणी करण्यासाठी एकूण केंद्र सरकारकडून महाराष्ट्रात तीन पथके येत आहेत. सर्व पथके महाराष्ट्रात २० डिसेंबरला दाखल होतील. सोलापूर दौऱ्यावर येणारे पथक सर्वप्रथम औरंगाबाद जिल्ह्याला भेट देईल. औरंगाबाद जिल्ह्याची पाहणी केल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाईल. त्यानंतर २२ डिसेंबरला पथक सोलापुरात दाखल होईल.