आंबा, डाळिंब, द्राक्ष पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:21 AM2021-05-17T04:21:01+5:302021-05-17T04:21:01+5:30
वादळी वाऱ्यात चिकमहूद येथील ७ शेतकऱ्यांच्या ६.३ हेक्टर क्षेत्रावरील टोमॅटो, केळी, डाळिंब फळ पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, तालुक्यातील ...
वादळी वाऱ्यात चिकमहूद येथील ७ शेतकऱ्यांच्या ६.३ हेक्टर क्षेत्रावरील टोमॅटो, केळी, डाळिंब फळ पिकांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, तालुक्यातील ९ मंडलपैकी सांगोला, नाझरे, महूद, संगेवाडी, कोळा, शिवणे या ६ मंडलमध्ये एकूण ३३ मि.मी. (सरासरी ३.५५) पाऊस झाला आहे. मात्र, हातीद, सोनंद व जवळा या तीन मंडलमध्ये पावसाने पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.
सांगोला शहर व तालुक्यात मार्च, एप्रिल, मे महिन्यात तापमान अधिक होते. यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या तयारीच्या दृष्टीने शेतीची मशागत सकाळी लवकर व सायंकाळी पाचनंतरच करीत होते. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिक, अबालवृद्धांचे लक्ष पावसाकडे लागले होते. शनिवारी सकाळपासूनच आकाशात ढगाळ वातावरण, अधूनमधून ऊनही पडत होते. मात्र, सायं. ५ नंतर जोरदार वादळी वारे वाहू लागले आणि मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. मुसळधार पावसामुळे रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे तुंबलेल्या गटारी मोकळ्या झाल्या.
जोरदार वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे पाडाला आलेला गावरान, केशर आंबा फळांचे नुकसान झाले. या वादळी वाऱ्याचा फटका द्राक्ष, डाळिंब, केळी, टोमॅटो पिकांनाही बसला आहे. अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या, वृक्ष उन्मळून पडल्याचे सांगण्यात आले. मात्र, कुठेही जीवितहानी झाली नाही. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप चालूच होती, तर रविवारी सकाळीही पावसाच्या सरी कोसळल्यामुळे नागरिक, अबालवृद्धांना अंगात हुडहुडी भरल्याचे अनुभवास आले. सलग दुसऱ्या दिवशी रविवारी दिवसभर आकाशात ढगाळ वातावरण असल्यामुळे पावसाची चिन्हे दिसून येत होती. दु. ४.३०च्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात बदल झाला आहे.
मंडलनिहाय पावसाची आकडेवारी
सांगोला ३ मि.मी., नाझरा २ मि.मी., महूद १२ मि.मी., संगेवाडी ३ मि.मी., कोळा १० मि.मी., शिवणे २ मि.मी. असा एकूण ३२ मि.मी. पाऊस झाला, तर हातीद, सोनंद, जवळा या तीन मंडलमध्ये पाऊस निरंक आहे.
फोटो ओळ :::::::::::::::
वादळी वारे व मुसळधार पावसात चिकमहूद येथील शेतकऱ्याचे टोमॅटो व केळीचे प्लॉट भुईसपाट झाल्याचे छायाचित्र.