वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्याला दमदाटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:21 AM2021-04-11T04:21:48+5:302021-04-11T04:21:48+5:30
सांगोल्याचे तलाठी विकास माळी, वाढेगावचे तलाठी अण्णासाहेब हटवे, सावेचे तलाठी हौसराव दराडे हे माण नदीच्या पात्रातून अवैध वाळू वाहतूक ...
सांगोल्याचे तलाठी विकास माळी, वाढेगावचे तलाठी अण्णासाहेब हटवे, सावेचे तलाठी हौसराव दराडे हे माण नदीच्या पात्रातून अवैध वाळू वाहतूक होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीवरून कारवाईसाठी गेले असता तेथे दोन बैलगाड्यांद्वारे अवैध वाळू वाहतूक होत असल्याचे दिसून आले. सदर वाळूने भरलेल्या बैलगाड्या पकडण्यासाठी तलाठी गेले. यावेळी एक बैलगाडी पकडून नवनाथ अण्णासाहेब हजारे याला ताब्यात घेतले. दुसरी बैलगाडी ताब्यात घेण्यासाठी ते पुढे गेले. यावेळी तलाठी विकास माळी यांनी बैलगाडीत चढून थांबविण्याचा प्रयत्न केला. यावेळी बैलगाडी चालकाने त्यांना जोराचा धक्का मारून गाडीतील वाळूवर पाडले व ‘तू पुन्हा आडवा आलास तर तुला बैलगाडीच्या चाकाखाली घालतो,’ अशी धमकी देऊन बैलगाडीतील वाळूसह पलायन केले. याबाबत तलाठी विकास अर्जुन माळी यांनी शुक्रवारी (दि. ९) फिर्याद दाखल केली आहे. यावरून पोलिसांनी पप्पू शिवाजी इंगोले याच्याविरुद्ध भादंवि ३५३ अन्वये सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल केला आहे.