सोलापुरात ‘कम्युनिटी स्प्रेड’चा धोका; काळजी घेण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 11:17 AM2020-05-25T11:17:38+5:302020-05-25T11:21:23+5:30
सोलापुरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय; नगरसेविकेचा पती, सेवानिवृत्त शिक्षक, रेशन दुकानदाराला कोरोना
सोलापूर : शहरात रविवारी कोरोनाचे नवे १८ तर सोमवारी सकाळच्या सत्रात ७ नवे रुग्ण आढळून आले. शहराच्या विविध भागातून कोरोनाचे रुग्ण येत आहेत. त्यामुळे शहरात कम्युनिटी स्प्रेड (सामुदायिक संसर्ग) सुरू झाल्याची शक्यता छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या (सिव्हिल) औषध वैद्यकशास्त्र विभागप्रमुख व कोरोना वॉर्ड प्रमुख डॉ. प्रसाद यांनी वर्तवली आहे.
वारद फार्म येथील नगरसेविकेच्या पतीला ताप, खोकल्याचा त्रास होत असल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्रास कमी न झाल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सिव्हिलमध्ये त्यांची स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. महापालिकेने रविवारी वारद फार्म परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या. नगरसेविकेसह कुटुंबातील सदस्य सिंहगड येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल झाले. नगरसेविका आणि तिचे पती गेली महिनाभर या परिसरात धान्य वाटप व इतर मदत वाटप करीत होते. नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी यांनी नगरसेविकेच्या घराजवळ राहणाºया लोकांना स्वॅब टेस्टसाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवून दिले.
घोंगडे वस्ती भवानी पेठ येथील मंडप व्यावसायिकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मजरेवाडी परिसरातील एका रेशन दुकानात काम करणाºया कर्मचाºयाला कोरोनाची लागण झाली आहे. दमाणी नगर येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाली असून मोदीखाना परिसरात या महिलेचे रेशन दुकान आहे. गंगा नगर येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाली. ही महिला पिठाची गिरणी चालवते.
पाच्छा पेठेतील सेवानिवृत्त एका शिक्षकाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्रास वाढल्यामुळे या शिक्षकाला शनिवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या शिक्षकाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
शनिवार पेठ, शास्त्री नगर, मुळेगाव रोड, सबजेल येथे कोरोनाचा प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. रविवार पेठेत दोन, न्यू पाच्छा पेठेत दोन, नीलमनगर परिसरात दोन रुग्ण आढळून आले आहेत.
यामुळे घ्यावी लागेल काळजी
- शहरात यापूर्वी खासगी व सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्स व कर्मचारी, रेशन दुकानदार, किराणा दुकानदाराला कोरोनाची लागण झाली आहे. या रुग्णांच्या संपर्कातील अनेकांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता पुन्हा मोदी खाना, मजरेवाडी, गंगा नगर येथील दुकानदार, पीठ गिरणी चालक यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे शहरात कम्युनिटी स्प्रेडचा धोका आणखी वाढल्याचे जिल्हा प्रशासनातील अधिकाºयांचे म्हणणे आहे.
चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीची टेस्ट पॉझिटिव्ह
- सबजेलमधील आरोपीला कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी या आरोपीला ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास सुरू झाला. त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक त्रास होत असल्याने दोन दिवसांपूर्वी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्या ठिकाणी त्याची स्वॅब टेस्ट घेण्यात आली. त्याचा अहवाल रविवारी आला. या आरोपीला चार महिन्यांपूर्वी चोरीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे