धोकादायक खोल्या पाडल्या नाहीत; म्हणून एका खोलीत भरतात दोन वर्ग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 03:28 PM2019-06-20T15:28:46+5:302019-06-20T15:30:47+5:30
सोरेगावची जिल्हा परिषद शाळा; आठ महिन्यात पाडण्याचे होते आदेश; शिक्षणावर होतोय परिणाम
सोलापूर : शहरालगतच्या सोरेगाव झेडपी शाळेतील सात धोकादायक खोल्या आठ महिन्यात बांधकाम विभागाने पाडलेल्या नाहीत. धोकादायक खोल्यांच्या समस्येमुळे एकाच खोलीत दोन वर्ग भरविण्याची पाळी शिक्षकांवर आली आहे.
सोरेगाव येथील झेडपी शाळेची स्थापना १९२२ मध्ये झालेली आहे. याठिकाणी पूर्वीचे विटाचे बांधकाम व पत्र्याचे छत असलेल्या सात खोल्या आहेत. या खोल्या जीर्ण झाल्यामुळे धोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या. यापैकी तीन खोल्यांची गेल्यावर्षी दुरुस्ती करण्यात आली. भिंतींच्या बाजूला अँगल उभे करून नव्याने पत्रे घालण्यात आले आहेत; मात्र बाजूच्या चार खोल्या दुरुस्तीयोग्य नसल्याचा अहवाल बांधकाम विभागाने दिला. या खोल्या पाडून टाकण्याचे आदेश देऊन आठ महिने झाले पण पुढील कार्र्यवाही झालीच नाही अशी तक्रार शिवगोंडा पाटील यांनी केली.
सोरेगाव झेडपी शाळेत पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग असून पटसंख्या ३१२ इतकी आहे. शाळेवर मुख्याध्यापकासह १४ शिक्षक व तीन अतिथी निरीक्षक कार्यरत आहेत. १९९२ च्या सोलापूरच्या हद्दवाढीनंतर या शाळेकडे लक्ष देण्यात आले नव्हते. स्थानिकांनी पाठपुरावा केल्यावर नवीन खोल्या बांधण्यात आल्या. शालेय निधी व लोकवर्गणीतून नवीन वर्ग बांधण्यात आल्यावर जुन्या इमारतीकडे दुर्लक्ष झाले. रोटरी क्लब, समाजसेवक जयनारायण भुतडा यांच्या सहकार्यातून स्मार्टक्लास उभारण्यात आले.
कला शिक्षकांनी शाळा रंगवून रेल्वे डब्याचा आकार दिला. भिंतीवर पक्षी, फळे, फुलांची चित्रे काढून मुलांना बोलते केले. याची दखल घेत राज्य शिक्षण विभागाने विज्ञान वर्गासाठी ५२0 कृती असलेले साहित्य दिले आहे.
पण धोकादायक इमारत पाडून नवीन इमारत बांधण्यास शासनाने निधी न दिल्याने एका वर्गात दोन वर्ग भरविण्याची पाळी शिक्षकांवर आली आहे. शहरालगत असलेल्या या शाळेची पटसंख्या चांगली आहे. पण केवळ चांगली इमारत नसल्याने अंगणवाडीचे दोन वर्ग उघड्यावर भरत आहेत. पावसाळ्यात मुलांना त्रास होतो व त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा बनल्याची व्यथा शिक्षकांनी मांडली. तरीही शालेय व्यवस्थापन समितीने लोकवर्गणीतून साहित्य गोळा करून दोन खोल्या बांधण्यास सुरुवात केली आहे.
पत्रे घालता येत नाहीत
- जुन्या सात खोल्यांपैकी तीन खोल्यांच्या भिंतींना आधार देऊन पत्रे घालण्यात आले. याप्रकारे इतर चार खोल्यांना समाजसेवकांनी पत्रे घालून देण्याची तयारी दर्शविली पण बांधकाम विभागाने खोल्या धोकादायक असल्याचा अभिप्राय दिला आहे. त्यामुळे दुरुस्तीयोग्य खोल्या नसल्याने बांधकाम पाडकामाची वाट पाहत आहोत अशी माहिती मुख्याध्यापक शरण्णप्पा लोणी यांनी दिली.