अमावस्येचा अंधारही दूर करतो ‘त्यांच्या’ आयुष्यातील काळोख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 02:38 PM2018-12-07T14:38:08+5:302018-12-07T14:40:49+5:30
मिरची, बिब्बा, कोहळा : खडी फोडणारे हात करतात व्यवसाय
गोपालकृष्ण मांडवकर।
सोलापूर : अमावस्या म्हणजे अंधार... दुष्ट शक्तींचा संचार असणारा काळ, अशी आपल्याकडे धारणा! म्हणूनच अमावस्येला शुभकार्ये शक्यतो टाळली जातात. मात्र याच अमावस्येचा अंधार काही जणांच्या आयुष्यातील काळोख दूर करून जगण्यासाठी आधार देत असेल तर...! होय, हे खरेच आहे. प्रत्यक्षात ही विसंगती वाटत असली तरी व्यवहारातील शाश्वत मात्र नक्कीच आहे.
सोलापुरातील अनेक चौकांमध्ये अमावस्येच्या आदल्या दिवशी कोहळे, मिरची, बिब्बा, लिंबू विकणारी बायकामुले हमखास दिसतात. नेमक ी अमावस्येच्या आदल्या दिवशीच होणारी ही विक्री या दृष्टीने लक्ष वेधणारी ठरते. आसरा चौकालगत रस्त्याच्या कडेला बसून अवसाबाई काळे या ६५ वर्षांच्या आजीबाई हमखास न चुकता अमावस्येच्या आदल्या दिवशी विकायला येतात, काही अंतरावर त्यांचा मुलगा आणि सूनही असेच रस्त्याच्या कडेला दुकान थाटून बसलेल्या दिसतात.
७ डिसेंबरला अमावस्या असल्याने आदल्या दिवशीही म्हणजे गुरूवार त्यांनी आपले दुकान लावले होते. अवसाबाई अशिक्षित. चार वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झालेले. विजापूर नाका परिसरात ते राहतात. कुटुंबात तीन मुले, सुना आणि नातवंडे. महिनाभर रस्त्यावर खडी फोडण्याचे काम ते करतात. दिवसभराच्या श्रमाने शरीर आंबून जाते. मजुरीही त्या मानाने कमीच मिळते. मात्र अमावस्या आली की, दोन दिवस खडी फोडण्याचे काम ते बंद करतात. आसरा चौकात कोहळे, लिंबू, मिरची, बिब्बा विकतात. यार्डातून ठोक भावाने माल आणतात. होणाºया या चिल्लर विक्रीतून हजार ते पाचशे रुपये हातात येतात. इतरांसाठी अमावस्या काळोखाची असली तरी त्यांच्यासाठी अंधार दूर करणारी ठरते, ती ही अशी!
आसरा चौकात जनाबाई काळे ही महिला अशीच विक्री करत असते. पुढे काही अंतरावर अवसाबाईचा लहान मुलगा विक्रीला बसतो. चार वर्षांपूर्वी तिथे त्याचे वडील विक्रीला बसायचे, ते गेल्यापासून हा मुलगा येथे बसून व्यवसाय करतो. डी-मार्ट चौकामध्ये जनाबाई पवार ही महिलासुद्धा अमावस्येला हा व्यवसाय करते. बाजारातून किलोभर बिब्बे आणून ते तारामध्ये ओवायचे. त्यात लिंबू, मिरची ओवण्यासाठी तिच्या तीन लहान मुली मदत करतात. मिरची-लिंबूची माळ २० रुपयात, बिब्बा पाच रुपयात, कोहळे ५० ते ६० रुपयात आणि शिंके २० रुपयांना असा ठरलेला दर. मात्र उन्हाळ्यात कोहळ्याचे उत्पादन नसते. पावसाळ्यात आणि हिवाळ्यातच हा व्यवसाय करता येतो. अशा वेळी केवळ लिंबू, मिरची बिब्बेच विकावे लागतात. यातून जे मिळेल त्यावर समाधान मानावे लागते.
संधी महिन्यातून एकदाच
- अमावस्या महिन्यातून एकदाच येत असल्याने अर्थार्जनाची ही संधीही महिन्यातून एकदाच मिळते. दुकानदार, व्यापारी, मराठी-कन्नड भाषिक अमावस्येच्या पूजेसाठी या वस्तू खरेदी करतात. रस्त्यावर खडी फोडून राठ झालेले हात अमावस्येला मात्र व्यवसायात गुंततात. औटघटकेचा हा व्यवसायही त्यांच्या अंधारलेल्या आयुष्याला उभारी देतो आणि प्रतीक्षा करायला लावतो... पुन्हा महिन्याने येणाºया अमावस्येची!