आज नामदेव पायरीचे दर्शन; घटस्थापनेला थेट विठ्ठलाचे दर्शन घेतो...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:24 AM2021-09-26T04:24:49+5:302021-09-26T04:24:49+5:30
कोरोना संसर्गजन्य रोगाच्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये अनेक वेळा पंढरपूर शहर लॉक, अनलॉक करण्यात आले. मात्र, श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर ...
कोरोना संसर्गजन्य रोगाच्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये अनेक वेळा पंढरपूर शहर लॉक, अनलॉक करण्यात आले. मात्र, श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंदच ठेवण्यात आले होते. विठ्ठलभक्त पंढरपुरात येत होते अन् चंद्रभागेचे पवित्र स्नान, विठ्ठल मंदिराच्या कळसाचे दर्शन व नामदेव पायरीचे दर्शन घेऊन गावी परत जात होते.
मात्र, मागील दोन वर्षांपासून भाविकांसाठी बंद असलेले श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे मंदिर घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी खुले करण्याबाबत निर्णय महाविकास आघाडीने शुक्रवारी जाहीर केला आहे.
राज्यभरातील विठ्ठलभक्त आनंदी झाले आहेत. त्याचबरोबर पंढरपूर शहरात भाविकांची आवक वाढणार. कोरोनामुळे डबघाईला आलेला व्यवसाय पुन्हा सुरळीत सुरू होणार असल्याने व्यापारीवर्गही आनंदी झाला आहे.
कोट :::::
श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर सुरू होणार आहे. सरकारने हा चांगला निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील भाविकांना विठुरायाचे दर्शन घडेल. त्याचबरोबर शहरातील व्यापाऱ्यांनाही संजीवनी मिळेल. त्याचबरोबर दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हातालादेखील काम मिळेल.
-सत्यविजय मोहोळकर,
अध्यक्ष, व्यापारी कमिटी पंढरपूर
कोट ::::::
तीन वर्षांपूर्वी विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आले होते. श्री विठ्ठलाचे पदस्पर्शदर्शन व मुखदर्शन व्हावे, अशी खूप इच्छा होती; परंतु कोरोनामुळे मंदिर बंद असल्याकारणाने विठ्ठलाचे दर्शन घेता येत नव्हते; परंतु ७ ऑक्टोबरपासून विठ्ठलाचे दर्शन घेता येणार आहे. यामुळे आम्ही खूप आनंदी झालो आहोत.
-कलप्ना बालाजी माने, भाविक, रा. चाकूर, जिल्हा लातूर
फोटो :
श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिराच्या श्री नामदेव पायरीचे दर्शन घेण्यासाठी इतर जिल्ह्यांतून आलेले भाविक. (छाया : सचिन कांबळे)