आजअखेर ९८५८ जणांना कोरोनाचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:21 AM2021-03-18T04:21:28+5:302021-03-18T04:21:28+5:30
श्रीपूर : माळशिरस तालुक्यात १६ मार्चअखेर ९,८५८ नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली असून, दुसऱ्या डोसचेही १,७३७ जणांचे लसीकरण पूर्ण ...
श्रीपूर : माळशिरस तालुक्यात १६ मार्चअखेर ९,८५८ नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली असून, दुसऱ्या डोसचेही १,७३७ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. गेल्या महिन्यापासून कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेऊन कोरोनावर मात करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते यांनी केले आहे.
शंकर नगर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मराठी पत्रकार संघ, माळशिरस तालुका आणि तालुका आरोग्य प्रशासन यांच्यातर्फे तालुक्यातील पत्रकारांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आतापर्यंत लसीकरण झालेल्यांमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील ४,२१९, फ्रंटलाईन कर्मचारी ४,२१९, दुसरा डोस १,७३७, ज्येष्ठ नागरिक ३,३०८ आदींचा समावेश आहे.
सध्या कोरोनाची रूग्णसंख्या वाढत आहे. नागरिकांनी मास्क, हातांची स्वच्छता, सामाजिक अंतर या त्रिसुत्रीसह गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. कोरोनावरील लस पूर्णपणे सुरक्षित असून, सर्वांनी लस घेऊन कोरोना वाढ रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते यांनी केले.
या शिबिरासाठी डॉ. वेदवती भोसले, आरोग्यसेविका ए. डी. भुसारे, एस. पी. कराड, परिचारिका व्ही. डी. कानडे, आरोग्यसेवक पी. एच. शेख, जे. एम. तारु, आरोग्य सहाय्यक एस. एम. नायकवडे, ए. व्ही. सूर्यगन, ए. बी. दडस, परिचर जगताप, अर्चना मिसाळ यांनी सहकार्य केले.
ज्येष्ठ नागरिकांसह ४५ ते ५९ वयोगटातील दमा, बी. पी., शुगर असे गंभीर आजार असणाऱ्या नागरिकांसाठी आरोग्य केंद्रात सिरम, पुणे येथील कोविशिल्ड लस उपलब्ध आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून, कोरोनाचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे. यासाठी नोंदणी केल्यानंतर लसीकरण करण्यात येते. त्यानंतर अर्धा तास विश्रांती घेऊन पुन्हा तपासणी केली जाते. लसीकरणानंतर कोणताही त्रास होत नाही. कुणाला काही त्रास झालाच तर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार किट डॉक्टरांसह सज्ज असल्याचे डॉ. ए. बी. आव्हाड यांनी सांगितले.