गाणगापूर येथे रथोत्सवाने दत्तजयंती उत्सवाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:18 AM2021-01-02T04:18:49+5:302021-01-02T04:18:49+5:30
दत्त जयंतीनिमित्त गाणगापूर येथे कोरोनाचे सर्व नियम पाळून सलग दोन दिवस कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडता उत्साहात यात्रा ...
दत्त जयंतीनिमित्त गाणगापूर येथे कोरोनाचे सर्व नियम पाळून सलग दोन दिवस कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडता उत्साहात यात्रा पार पडली. यात्रेच्या पहिल्या दिवशी जन्मोत्सव सोहळा पार पडला. दुसऱ्या दिवशी दुपारी ४ वाजता रथाचे विधिवत पूजन मंदिराचे मुख्य पुजारी धनंजय पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर श्रीदत्त मंदिर ते मारुती मंदिरापर्यंत रथोत्सव कार्यक्रम पार पडला. या वेळी शेकडो भाविकांनी सहभागी होऊन दत्तगुरूंचा जयघोष केला.
दरम्यान, भाविकांनी रथावर केळी, मुरमुरे, फुलांची मुक्तहस्ते उधळण केली. बँड, बँजो, वाजंत्री वाद्ये वाजवित सहभागी झाले होते. प्रत्येक भाविकाला मास्कची सक्ती करण्यात आली होती. पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. संपूर्ण यात्रेचे नियोजन प्रशासनाधिकारी नामदेव राठोड यांनी केले. भाविकांची उपस्थिती कमी राहावी यादृष्टीने रथोत्सवाच्या वेळेत बदल करण्यात आला होता.
जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी मंदिर समितीचे सचिव धनंजय पुजारी, माजी नगराध्यक्ष नंदकुमार पुजारी, संतोष पुजारी, रवींद्र पुजारी, सदाशिव पुजारी, गोपालभट्ट पुजारी, चैतन्य पुजारी, बाळकृष्ण पुजारी, प्रसाद पुजारी, निरंजन पुजारी, मधुकरभट्ट पुजारी, वलभभट्ट पुजारी, राजेंद्र पुजारी, कृष्णभट्ट पुजारी, गोपाळ पुजारी यांच्यासह ग्रामस्थ, भाविक, पुजारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.
फोटो
०१अक्कलकोट-दत्त जयंती
ओळी
गाणगापूर येथे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत रथोत्सव कार्यक्रमाने दत्तजयंती उत्सवाची सांगता झाली.