मुलगी परीक्षेला अन् वडील ज्वारी काढायला; चोरट्यानं घरातून ऐवज पळवला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 10:55 AM2022-03-24T10:55:28+5:302022-03-24T11:01:08+5:30
अलीकडे उन्हाची तीव्रता वाढत चालली असून, पंढरीनाथ हे सोमवारी सकाळी शेतात ज्वारी काढायला गेले
बार्शी : पिंपळगाव धस येथे कुलपाभोवती कडी वाकडी करून चोरट्यांनी कपाटातील ७२ हजारांचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. विशेषत: मुलगी दहावीच्या परीक्षेला अन् वडील शेतात ज्वारी काढायला गेल्यानंतर चोरट्यांनी २१ मार्च रोजी भर दिवसा घर फोडले. २१ मार्च रोजी चोरीचा प्रकार उघडकीस येताच शेतकरी पंढरीनाथ आंबरुषी चव्हाण (वय ४२, रा.पिंपळगाव, धस ता. बार्शी) यांनी बार्शी तालुका पोलिसांत धाव घेतली.
अलीकडे उन्हाची तीव्रता वाढत चालली असून, पंढरीनाथ हे सोमवारी सकाळी शेतात ज्वारी काढायला गेले. या दिवशी त्यांची मुलगी दहावी परीक्षेचा पेपर देण्यासाठी, तर फिर्यादी घरच्यांसह शेतात ज्वारी काढण्यासाठी कुलूप लावून गेले होते. पत्र्याच्या शेडचा बंद घराचा दरवाजा पाहून चोरटे इकडे वळले. त्यांनी कडीतून कुलूप बाजूला करण्याचा प्रयत्न केला. नंतर कडीचा आकार मोठा करून दरवाजा ढकलून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. ७२ हजारांचे दागिने लंपास केले. यानंतर त्यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. या घटनेनंतर हेड कॉन्स्टेबल भोसले, लोहार यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अन् घरफोडी निदर्शनास आली...
याच दिवशी मुलाला कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस द्यायला जायचे होते. आधार कार्ड घेण्यासाठी लोखंडी कपाट उघडताना दरवाजा उघडा दिसला. आधार कार्डसाठी वळताच दोन्ही लाॅकर हे कशाने तरी उचकटल्याचे दिसले. त्यातील सोन्याच्या दागिन्यांची पाहणी केली असता ते निदर्शनास आले नाहीत. पाहणी केली असता चोरट्यांनी घर साफ केल्याचे स्पष्ट झाले.
अंगठ्या, बोरमाळ, गंठण पळविले...
पिंपळगाव धस येथील घरफोडीत चोरट्यांनी कपाटाच्या लॉकरमधून ३० हजारांच्या अंगठ्या पळविल्या. याबरोबरच १४ हजारांची बोरमाळ, १६ हजाराचे गंठण, १२ हजारांची कर्णफुले आदी ऐवज चाेरट्यांनी पळविला.