पोटच्या मुलीला दारु पाजून अत्याचार करुन केला खून; आई-बापाला फाशीची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 08:37 AM2022-06-03T08:37:08+5:302022-06-03T08:49:39+5:30
सोलापूर न्यायालयाचा निकाल
सोलापूर : पोटच्या सोळा महिन्यांच्या मुलीला दारू पाजून तिच्यावर अत्याचार करून, खून केल्याप्रकरणी सोलापूर जिल्हा न्यायालयाने
पती-पत्नीला फाशीची शिक्षा सुनावली. धोलाराम अर्जुनराम बिष्णोई (२६), पुनीकुमारी धोलाराम बिष्णोई (२०, रा. तेलंगणा, मूळ गाव बारासण, तहसील गुडामालाणी, जि. बाडमेर राजस्थान) असे फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
३ जानेवारी २०२२ रोजी धोलाराम बिष्णोई याने मुलीला राहत्या घरी दारू पाजली. तिच्यावर नैसर्गिक व अनैसर्गिक अत्याचार केला. तिला त्रास होत असल्यामुळे ती रडत होती, तेव्हा ओढणीने तिचा गळा आवळून खून केला. या कृत्यात पत्नी पुनीकुमारी बिष्णोई हिने मदत केली होती.
या प्रकाराची माहिती कोणालाही न देता दोघे मृत मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सिकंदराबादहून राजस्थानकडे रेल्वेने जात होते. राजकोट एक्स्प्रेसमध्ये जात असताना प्रवाशांना संशय आला. कर्नाटकातील वाडी रेल्वे स्थानकावर हा प्रकार उघडकीस आला. येथे डॉक्टर व पोलीस फोर्स उपलब्ध नसल्याने दोघांना सोलापूर रेल्वे स्टेशनवर पाठविण्यात आले. या प्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.
३१ साक्षीदार तपासले
२६ एप्रिल २०२२ रोजी न्यायालयात खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली. सरकार पक्षातर्फे सिकंदराबाद, वाडी, सोलापूर, राजस्थान आणि नेपाळ येथील एकूण ३१ साक्षीदार तपासण्यात आले. नेपाळ येथील साक्षीदाराची तपासणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आली.