दिवसाची सुरुवात होते इथं नामस्मरणाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:16 AM2021-06-10T04:16:14+5:302021-06-10T04:16:14+5:30
वैराग : गौडगाव (ता. बार्शी) येथील सहारा वृद्धाश्रमात दररोज देवाचे नामस्मरण आणि भक्तिगीताने दिवसाची सुरुवात होत असल्याने येथील वयस्क ...
वैराग : गौडगाव (ता. बार्शी) येथील सहारा वृद्धाश्रमात दररोज देवाचे नामस्मरण आणि भक्तिगीताने दिवसाची सुरुवात होत असल्याने येथील वयस्क नागरिकांचेही मन प्रसन्न होत असल्याची माहिती चालक राहुल भड यांनी दिली.
गतवर्षी लॉकडाऊन झाल्यानंतर हातावरचं पोट असणाऱ्या भिक्षेकरुंवर उपासमारीची वेळ आली होती. अशावेळी भड व त्यांच्या मित्रांनी पदरमोड करून अशा पाच-सहा लोकांना डबे देण्यास सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू लोकांची संख्या वाढू लागली. मग समाजातील काही लोकांना मदतीचे अवाहन केले. त्यातून आलेली काही मदत व मित्र कंपनींनी मिळून या लोकांच्या पोटापाण्याची सोय केली. आज या वृद्धाश्रमात सोळा वयोवृद्ध नागरिक लाभ घेत आहेत. यापैकी काहींना कोणीच वारसदार नाही तर काहींना मुलं सांभाळत नाहीत.
अशांना या वृद्धाश्रमाचा आधार मिळाला आहे. आठवड्यातील पाच दिवस त्यांना कीर्तन, भजन, प्रबोधन, करमवणुकीचे कार्यक्रम, भेंड्या, आरोग्यविषयक असे वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. बऱ्याचवेळा त्यांच्यासोबत जेवण करून यांच्या समस्या जाणून घेतल्या जातात. यासाठी तात्यासाहेब इंगळे, संजय भड, दीपक जाधव, दत्तात्रय वाघ, तुषार भोसले यांचे मोलाचे सहकार्य मिळते. यामुळे येथील वृद्धांचा रोजचा दिवस आनंदात जात असल्याचे राहुल भड यांनी सांगितले.
---
कोरोनावर मात करून आजोबा वृद्धाश्रमात परतले
वृद्धाश्रमातले ६५ वर्षीय देवेंद्र जाधव यांना गत आठवड्यात आजारी पडल्यामुळे दवाखान्यात नेले. तेथे कोरोनाची बाधा झाल्याचे समजले. प्रकृती खूप खालावल्याने त्यांना बावीस दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. यावेळी जाधव यांचे खासगी दवाखान्यात किमान तीन लाख रुपये बिल झाले असते. परंतु उस्मानाबाद येथील रुग्णालयात मोफत उपचार करण्यात आले. आज त्यांची तब्येत ठणठणीत असून, वेळच्यावेळी त्यांना औषधगोळ्या दिल्या जात असल्याचे भड यांनी सांगितले.