अष्टपैलू कामगिरी करत ‘दयानंद’ने मारली बाजी
By appasaheb.patil | Published: September 23, 2019 12:19 PM2019-09-23T12:19:41+5:302019-09-23T12:22:30+5:30
सोलापूर विद्यापीठाचा युवा महोत्सव; बार्शीचे शिवाजी महाविद्यालय दुसºया स्थानावर; सोलापूर विद्यापीठ अधिविभाग तृतीय
सोलापूर : दरवर्षी येणारा सोलापूर विद्यापीठाचा युवा महोत्सव आणि बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाकडे जाणारे विजेतेपद हे जणू एक अतुट नातेच निर्माण झाले होते. मात्र, यंदा बार्शीच्या श्री शिवाजी महाविद्यालयास मागे टाकत सोलापुरातील दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपदावर आपले नाव कोरले. त्यामुळे बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाला दुस्ºया स्थानावर समाधान मानावे लागले.
दयानंद महाविद्यालयाने लोकमंगल महाविद्यालय वडाळा येथे झालेल्या १६ व्या युवा महोत्सवात पथनाट्य, मूकनाट्य, फोक आॅर्केस्ट्रा, समूहगीत, प्रश्नमंजूषा या सांघिक तर मातीकाम, वक्तृत्व इंग्रजी, शास्त्रीय गायन या वैयक्तिक कलाप्रकारात आपली वेगळी छाप उमटवली. तसेच लघुनाटिका, एकांकिका, रांगोळी, स्पॉट फोटोग्राफी, वक्तृत्व हिंदी, वादविवाद, सुगम गायन यात द्वितीय तर कातरकाम, भित्तीचित्रण, स्थळचित्रण, शास्त्रीय तालवाद्य या कलाप्रकारातही महाविद्यालयाने चांगले यश संपादन केले. याशिवाय पूजा काटकर हिच्या रुपाने ‘गोल्डन गर्ल’ व शुभम रणखांबे त्याच्या रूपाने ‘गोल्डन बॉय’चा किताब पटकाविला.
याशिवाय बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाने सर्वसाधारण उपविजेतेपद पटकाविले असून, या महाविद्यालयाच्या संघाने रांगोळी, व्यंगचित्र, भित्तीचित्रण, स्थळचित्रण, सूगम गायन, समूहगीत, मूकनाट्य, शास्त्रीय सूरवाद्य, शास्त्रीय गायन, कातरकाम, एकांकिका, वक्तृत्व इंग्रजी या कलाप्रकारात आपला दबदबा कायम ठेवला. याशिवाय वाङ्मय विभागात शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालय, अकलूज, नाट्य विभागात अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर, नृत्य विभागात डी. ए. व्ही. वेलणकर महाविद्यालय, सोलापूर तर संगीत विभागात कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूरने विजेतेपद पटकावले.
कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की, विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात येणाºया या युवा महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. आज मोठ्या संख्येने या महोत्सवात सहभाग घेऊन विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करून हिम्मत दाखवली. एक प्रकारची ऊर्जा या माध्यमातून निर्माण झाली आहे. विद्यापीठ सातत्याने विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील असते, असे सांगून विद्यार्थ्यांचे अभिनंदन त्यांनी यावेळी केले.
पारितोषिक वितरणाचे वाचन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले. यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून पूजा खपाले आणि पूजा काटकर यांनी तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून प्रा. ममता बोल्ली यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य श्रीकांत धारूरकर यांनी केले तर आभार डॉ. वसंत कोरे यांनी मानले.