सार्वजनिक महिला शौचालयामध्ये आढळला बालकाचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 12:40 PM2023-01-23T12:40:51+5:302023-01-23T12:44:05+5:30
पंढरपुरातील घटना, शरीरातील काही भाग गायब
पंढरपूर: महिलांसाठी बांधण्यात आलेल्या परंतु बंद असलेल्या सार्वजनिक शौचालयामध्ये बालकाचा मृतदेह सोमवारी पहाटे आढळून आला. तिमा पांडूरंग धोत्रे (वय ३८, रा जगदंबा वसाहत, संतपेठ, पंढरपूर) यांचा मुलगा कृष्णा तिमा धोत्रे (वय ९) हा रविवारी रात्री आठ वाजता नातेवाईकांच्या घरातून जेवण करून बाहेर गेला. रात्री उशिरापर्यंत तो स्वतःच्या व नातेवाईकांच्या घरी आला नाही. त्यामुळे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न घरातील मंडळी करत होते. सोमवारी पहाटे त्यांना हा मृतदेह आठळला.
तिमा धोत्रे हे संतपेठ पंढरपूर येथील घराशेजारी बंद असलेल्या सार्वजनिक महिला शैचालयाजवळून सोमवारी पहाटे जाताना मृतदेह आढळून आला. त्यांनी मोबाईलची बॅटरी लावून पाहिल्यानंतर तो मृतदेह कृष्णाचा असल्याचे समजले. त्याचा शरीरातील नरड्याखालील भाग ते बेंबीपर्यंतचा भाग गायब होता.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण फुगे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सपोनि सी. व्ही केंद्रे, प्रमुख सपोनि कपिल सोनकांबळे, पोउपनि आकाश भिंगारदेवे, पोलीस कर्मचारी सूरज हेंबाडे, सचिन हेंबाडे, दादा माने, सचिन इंगळे, बिपीन ढेरे, शरद कदम, राकेश लोहार, शहाजी मंडले, सुनील बनसोडे यांनी घटनास्थळी भेट दिली.
प्राथमिक अंदाज- डुक्कर या जनावराने त्या मुलास जखमी केले असेल. तसेच त्या मुलाच्या शरीराचा काही भाग खाल्ला असेल या तो मयत झाला असेल पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
घातपात झाला असावा- त्या लहान मुलावर डुक्कराचा हल्ला नसून घातपात असावा. याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी घटनास्थळाला पोलिसांनी भेट दिल्यानंतर संतपेठ परिसरातील नागरिकांनी केली.