वाळूमाफियांकडून ट्रॅक्टर अंगावर घालून पोलिसांवर जीवघेणा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:24 AM2021-08-26T04:24:52+5:302021-08-26T04:24:52+5:30
पोलिसांनी ट्रक्टर चालकास अटक केली आहे. अन्य दोघे पळून गेले. या जीवघेण्या हल्ल्यात तुकाराम माने-देशमुख हे पोलीस जखमी झाले. ...
पोलिसांनी ट्रक्टर चालकास अटक केली आहे. अन्य दोघे पळून गेले. या जीवघेण्या हल्ल्यात तुकाराम माने-देशमुख हे पोलीस जखमी झाले. सुधीर सोरटे, महादेव शेळके, समाधान जरक (सर्वजण टाकळी (टें) ता. माढा) अशी गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी तिघांविरुद्ध भादंवि ३०७ नुसार गुन्हा नोंदला आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार भीमा नदीतून चोरट्या पद्धतीने वाळू उपसा होत असल्याची माहिती टेंभुर्णी पोलिसांना मिळाली. या अनुषंगाने कारवाईसाठी टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील पोलीस तुकाराम माने-देशमुख व बाळराजे घाडगे हे टाकळी (टें) येथे भीमा नदी पात्रात गेले होते. त्यावेळी नदी पात्रामधून अवैधपणे वाळू उपसा करून तिघेजण त्यांच्या समोरून वाळू भरलेला ट्रॅक्टर घेऊन जात होता. तो ट्रॅक्टर अडवून पोलिसांनी त्याला ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यास सांगितले. त्यांनी नकार देत पोलीस कर्मचारी माने-देशमुख व घाडगे यांना धक्काबुक्की केली. तर ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या सुधीर सोरटे हातात टॉमी घेऊन त्यांना मारण्यासाठी धावून आला. ट्रॅक्टर मालकाने त्याच्या ट्रॅक्टर चालकास ट्रॅक्टर जाऊ दे व पोलीस आडवे आले तर घाल अंगावर असे फर्मान सोडले. यामुळे ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर जोरात चालवून पोलीस कर्मचारी तुकाराम माने-देशमुख यांच्या अंगावर घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माने-देशमुख बाजूला खाली पडून जखमी झाले. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले करीत आहेत.
---
ट्रॅक्टरचालकास अटक; दोघे पळाले
या कारवाईत पोलीस कर्मचाऱ्याची दुचाकी व बाजूला उभी असलेल्या जीपचे नुकसान झाले. पोलिसांनी आरोपीकडील वाळूने भरलेला ट्रॅक्टर (एमएच-४२-क्यू-३३९४) जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी ट्रक्टर चालक सुधीर सोरटे यास ताब्यात घेत अटक केली आहे तर दोघे अद्याप फरार आहेत.
----
कर्तव्यात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करणे हा गंभीर गुन्हा आहे. याची दखल घेण्यात आली असून, यापुढे अशा गुन्हेगारावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येईल.
- सुरेश निंबाळकर पोलीस निरीक्षक टेंभुर्णी.