उभ्या पिकातून जाऊ नको म्हणत दोघा चुलत भावांवर जीवघेणा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:40 AM2021-03-04T04:40:36+5:302021-03-04T04:40:36+5:30
अधिक माहिती अशी की, फिर्यादी श्रीकांत गणपती पोलासे यांचा मुलगा धोंडप्पा पोलासे मंगळवारी सकाळी शेतात पिकास पाणी देण्यास गेला ...
अधिक माहिती अशी की, फिर्यादी श्रीकांत गणपती पोलासे यांचा मुलगा धोंडप्पा पोलासे मंगळवारी सकाळी शेतात पिकास पाणी देण्यास गेला होता. त्यावेळी त्याचा चुलत भाऊ सुरेश पोलासे जनावरे घेऊन फिर्यादीच्या बाजूला शेतात जात होता. तेव्हा धोंडप्पाने त्याला अडवून ‘तू रोज येथून जनावरे घेऊन जाऊ नकोस, यामुळे माझ्या उभ्या पिकाचे नुकसान होत आहे. असे म्हणाल्याने दोघांमध्ये वादविवाद झाला होता. तेव्हा सुरेश मी याच जमिनीतून घेऊन जाणार असे म्हणाला. याबाबत धोंडप्पाने सर्व हकीकत वडील श्रीकांत पोलासे यांना सांगितली. त्यांनी दुर्लक्ष केले.
दरम्यान सुरेशने मात्र वडील मलप्पा, भाऊ उमेश यांना सांगितले. तिघांनी तत्काळ कुऱ्हाडी, खोऱ्या घेऊन शेताकडे जाऊन एकट्या धोंडप्पावर हल्ला करुन गंभीर जखमी केले. रक्तबंबाळ अवस्थेत जखमी धोंडप्पाने घराकडे मोबाईलवरून झाल्याप्रकाराची माहिती दिली.
फिर्यादीने घटनास्थळी जाऊन पाहिले असता, धोंडप्पा जखमी अवस्थेत पडला होता. फिर्यादीचे मोठा मुलगा भीमाशंकर त्याला उपचारासाठी घेऊन येताना आरोपींनी पुन्हा गावाजवळ वाहनातून (एम एच-१३ ए झेड ०५८८) येऊन तलवार घेऊन खाली उतरले. भीमाशंकर याच्या डोक्यात वार केला. फिर्यादीलासुद्धा मारहाण केली. त्यानंतर तिघांनाही अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, अशी फिर्याद श्रीकांत पोलासे यांनी दिली आहे.
पोलिसांनी आरोपी उमेश, मलप्पा, सुरेश पोलासे या तिघांविरुद्ध ३०७ कलमान्वये गुन्हा नोंदला आहे. अधिक तपास सपोनि देवेंद्र राठोड करीत आहेत. पोलिसांनी आरोपीना तत्काळ अटक केली आहे. बुधवारी येथील कोर्टासमोर उभे करण्यात येणार आहे.
----
अनेक वर्षांपासून भावकीचे भांडण
गेल्या अनेक वर्षांपासून पोलासे कुटुंबाचा भावकीतला वाद आहे. यापूर्वीही किरकोळ बाचाबाचीच प्रकार घडला आहे. गावकऱ्यांनी मध्यस्थी करुन हे भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र मिटू शकले नाही. मंगळवारी त्याचे पर्यवसन जीवघेण्या हल्ल्यात झाले.