सोलापुरातील प्राध्यापकासह दोघांचा स्वाईन फ्लूने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 11:37 AM2018-11-14T11:37:06+5:302018-11-14T11:39:21+5:30
वर्षभरात ११ जण दगावले : जिल्ह्यात १०८ जणांना झाली लागण
सोलापूर : जिल्ह्याला घाबरवून सोडलेल्या स्वाईन फ्लूने एक महिला आणि एक प्राध्यापक अशा दोघांचा मंगळवारी मृत्यू झाला. सोनाली आप्पाशा सुरवसे (वय २८, रा़ पानमंगरुळ, ता़ अक्कलकोट, जि़ सोलापूर) आणि काकासाहेब नागनाथ तोडकरी (वय ३५, रा़ वांगी, ता़ दक्षिण सोलापूर) असे मरण पावलेल्या दोघांची नावे असून, वर्षभरात या आजाराने बळी जाणाºयांची संख्या आता ११ झाली आहे.
सोमवारी घोंगडे वस्तीमध्ये जयश्री हक्के या गरोदर विवाहितेचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला़ ही घटना ताजी असताना मंगळवारी आणखी दोन जण दगावल्याने जिल्ह्याची आरोग्ययंत्रणा कामाला लागली आहे.
मागील मंगळवारी (६ आॅक्टोबर) सोनालीला ताप आणि इतर किरकोळ आजाराची लक्षणे दिसून येत होती़ तिला येथील यशोधरा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता स्वाईन फ्लूची लागण झाल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांना आला़ तिच्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये स्वाईन फ्लू स्पष्ट होताच उपचाराला सुरुवात झाली़ मात्र प्रकृती खालावत गेली आणि पुढील उपचारासाठी तिला पुण्यामध्ये ससून रुग्णालयात हलविण्याची तयारी झाली़ वाटेत तिचा मृत्यू झाला़ त्यानंतर तिचा मृतदेह पानमंगरुळला हलविण्यात आला़ कुमठे (ता़ उत्तर सोलापूर) येथील भोपळे-माने कुटुंबीयांनीदेखील तिला वाचविण्यासाठी प्रयत्न केला होता़ सोनालीचे पती हे वीज मंडळात कार्यरत असून तिच्या पश्चात दोन मुले, दीर आणि सासू-सासरे असा परिवार आहे.