दुसऱ्या लाटेत वाढत्या रुग्णसंख्येसह मृत्यूचे प्रमाण अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:23 AM2021-04-20T04:23:07+5:302021-04-20T04:23:07+5:30
तालुक्यात संचारबंदीला नागरिकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळेच रुग्णसंख्या वाढत आहे. यासाठी अक्कलकोट येथे किमान २५ बेडचे कोरोनावर ...
तालुक्यात संचारबंदीला नागरिकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळेच रुग्णसंख्या वाढत आहे. यासाठी अक्कलकोट येथे किमान २५ बेडचे कोरोनावर उपचार होणारे कोविड केअर सेंटर उभारणे आवश्यक आहे. तालुक्यात आतापर्यंत १ हजार ६१७ रुग्ण संख्या झाली असून ७८ जणांना जीव गमवावा लागला आहे.
शहर व तालुक्यात भाजीपाला, किराणा, डेअरी, दवाखाना या अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेक जण विनाकारण फिरताना दिसतात. शिवाय हे लोक मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्स हे नियम पाळले जात नाहीत. विशेषतः ग्रामीण भागातील लोक कोरोनाची लक्षणे असूनही बरेच वेळा अंगावर काढतात किंवा जवळील डॉक्टरांकडून तपासणी करून उपचार घेतात. यात वेळ निघून जातो आणि आजार वाढल्यावर सोलापूर येथे उपचार घेण्यासाठी जाता. त्या ठिकाणी वेळेवर बेड मिळत नाही. मिळाले तरी महागडे उपचार खर्च परवडत नाही. यामुळे परिणामी जीव गमवावा लागल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
तज्ज्ञ डाॅक्टर, कर्मचाऱ्यांअभावी कोविड सेंटर नाही
कोरोनाच्या पहिल्या लॉटेत स्वामी समर्थ रुग्णालयात १० लाख रुपये खर्चून कोविड केअर सेंटर तयार केले आहे. मात्र, केवळ तज्ज्ञ डॉक्टर व तंत्रशुद्ध कर्मचाऱ्यांअभावी कार्यरत होऊ शकले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन वेळा जाहिरात दिली. मात्र, त्यास प्रतिसाद मिळालेला नाही. यासाठी आ. सचिन कल्याणशेट्टी, तहसीलदार अंजली मरोड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आश्विन करजखेडे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड यांनी परिश्रम घेतले आहे.
विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करावी
विनाकारण फिरणारे, मास्क न वापरणे, शारीरिक आंतर न ठेवणे, अशा लोकांवर दंडात्मक कारवाई करावी. शिवाय जागेवर अँटिजन टेस्ट केल्यास रस्त्यावरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. अत्यावश्यक सेवेतील अनेकांकडे अद्याप तपासणी झालेली नाही. त्यांचीही तपासणी केल्यास संसर्ग रोखण्यास मदत होईल.
एकाच दिवसात पाच जणांचा मृत्यू
एकाच दिवसात समर्थनगर येथील ६७ वर्षीय पुरुष, बासलेगाव येथे ६६ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय पुरुष, गळोरगी येथील ६५ वर्षीय पुरुष, बावकरवाडी येथील ६५ वर्षीय पुरुष यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.