सोलापूर जिल्ह्यातील जीवघेण्या ३२ ‘ब्लॅक स्पॉट’वर १२८७ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 11:32 AM2020-02-29T11:32:33+5:302020-02-29T11:34:28+5:30
वाढते शहर, वाढती वाहने लक्षात घेता सध्या अपघाताचे प्रमाण वाढले
संताजी शिंदे
सोलापूर : एका ठिकाणी तीन वर्षांत दहापेक्षा जास्त अपघात झाले असतील अन् त्यात तीनपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्यास त्याला अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) म्हणून ओळखले जाते. शहर-जिल्ह्यातील एकूण ३२ ब्लॅक स्पॉटवर गेल्या दोन वर्षांत एक हजार २८७ लोकांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस हे ब्लॅक स्पॉट मृत्यूचा सापळा बनत चालले आहेत.
वाढते शहर, वाढती वाहने लक्षात घेता सध्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण १९ ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. या भागात सातत्याने अपघात होत असून, अनेक वाहन चालकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत झालेल्या गंभीर अपघातांमध्ये २०१८ मध्ये ९७ तर २०१९ मध्ये ८७ जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीत राष्ट्रीय व राज्य महामार्गावर एकूण १३ ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. २०१८-२०१९ या दोन वर्षांच्या कालावधीत एकूण दोन हजार १०९ अपघात झाले आहेत. अपघातामध्ये एकूण एक हजार १०३ लोकांचा मृत्यू झाला आहे.
८० टक्के उपाययोजना केल्या : मनोज पाटील
२०१४, २०१५, २०१६ च्या अपघातांच्या संख्येनुसार सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात २५ ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आलेले होते. २०१६ ते २०१८ दरम्यान एकूण १३ ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आलेले आहेत. ब्लॅक स्पॉट ठिकाणी आरटीओ सोलापूर व आरटीओ अकलूज यांच्याकडील अधिकारी तसेच नॅशनल हायवे अधिकारी यांच्यासमवेत अपघाताचे प्रमाण कमी करण्याकामी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांना अंशकालीन व दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. बºयाच ठिकाणी ८० टक्के उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
शहरातील ब्लॅक स्पॉट...
- शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत केगाव, जुना पुणे नाका (पुणे राष्ट्रीय महामार्ग), एस.टी. स्टॅन्ड, सात रस्ता, जुना विजापूर नाका, आयटीआय पोलीस चौकी, इंचगिरी मठ, सैफुल, एसआरपी कॅम्प, सोरेगाव, हत्तूरगाव, शांती चौक अक्कलकोट रोड, जुना अक्कलकोट नाका, जुना बोरामणी नाका, मार्केट यार्ड, हैदराबाद रोड, मुळेगाव क्रॉस रोड, जुना तुळजापूर नाका, देगाव टोलनाका.